Missionary School Harass Hindu Student : बलिया ‘सेंट मेरी’ विद्यालयातील वर्गशिक्षकाने हिंदु विद्यार्थ्याची शेंडी कापली !

विद्यार्थ्याच्या आईने शाळेत जाऊन तक्रार केल्यावरून मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी त्यांच्याशीही केले गैरवर्तन !

पीडित विद्यार्थी

बलिया (उत्तरप्रदेश) – येथील ‘सेंट मेरी’ या मिशनरी शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्‍या प्रभाकर नावाच्या एका हिंदु विद्यार्थ्याची शेंडी त्याच्याच वर्गशिक्षकाने कापून टाकल्याची घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थ्याच्या टिळा लावण्यावरूनही शिक्षकाने आक्षेप घेतला. एवढेच नाही, तर विद्यार्थ्याची आई तक्रार करण्यासाठी शाळेत आली असता तिच्याशीही गैरवर्तन केले. ही घटना २ मेची असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याचे वडिल विवेकानंद सिंह यांनी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

१. बलियाच्या मरियमपूर राघोपूर भागात असलेल्या ‘सेंट मेरी स्कूल’च्या शाळेच्या मुख्याध्यापिकेचे नाव सिस्टर दया दास आहे. शाळेच्या आत धर्मांतराचे षड्यंत्रही रचले जात असल्याचा संशय पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

२. विवेकानंद सिंह यांचा आरोप आहे की, वर्गशिक्षकाने प्रभाकरने शेंडी ठेवल्यावरून त्याला शिवीगाळ केली. शिक्षक म्हणाला की, तू शेंडी ठेवून शाळेत कसा काय आलास ? शेंडी ठेवून आणि टिळा लावून शाळेत येण्यावर सक्त मनाई आहे. यानंतर वर्गशिक्षकाने प्रभाकरची शेंडी कात्रीने कापली.

३. प्रभाकरची आई या घटनेच्या विरोधात शाळेत तक्रार करण्यासाठी गेल्यावर शिक्षक आणि मुख्याध्यापक दोघांनी ‘तुला जे करायचे, ते कर !’ अशा उर्मट भाषेत त्यांना उत्तर दिले. हा हिंदु धर्माचा अवमान असल्याचेही विवेकानंद यांनी तक्रारीत म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • मिशनरी शाळांचे खरे रूप जाणा ! धार्मिक स्वातंत्र्याचे हे हनन असून बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्याच वाट्याला अशी परिस्थिती ओढावणे, हे हिंदूंसाठीच लज्जास्पद !
  • मदरशांप्रमाणेच ख्रिस्त्यांच्या मिशनरी शाळाही धर्माच्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांचा छळ करत असलेल्या घटना वारंवार समोर येत असतात. त्यामुळे मदरशांप्रमाणेच आता मिशनरी शाळांवरही बंदी घालण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • शाळेत हिजाब घालण्याला ‘धार्मिक स्वातंत्र्य’ संबोधणारे आता या प्रकरणी हिंदु विद्यार्थ्याने शेंडी ठेवणे आणि टिळा लावणे या कृतींचे समर्थन का करत नाहीत ?