Indians Russia War : रशियाकडून युद्ध लढण्यासाठी भारतियांना बाध्य करणार्या टोळीतील आणखी २ जणांना अटक !
देशातील ७ शहरांत १० ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या धाडी
नवी देहली – विदेशात नोकरी देण्याच्या नावावर काही युवकांना फसवून त्यांना रशियात नेण्यात आले आणि युक्रेनच्या विरोधातील युद्धामध्ये सहभागी होण्यासाठी बाध्य करण्यात आले. याचा भांडाफोड मार्चमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने केला होता. यांतर्गत ४ लोकांना अटकही करण्यात होती. आता अरुण आणि येसुदार या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही केरळच्या थिरूवनंतपूरम् येथील रहिवासी आहेत.
अशी केली जात होती फसवणूक !
गेल्या महिन्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबईतून निजिल जॉबी बेनसन अँथनी मायकल याला अटक केली होती. मायकल रशियामध्ये दुभाषाचे काम करत होता आणि भारतियांना रशियाला पाठवण्याच्या टोळीतील एक प्रमुख सदस्य होता. मायकल दुबईमध्ये कार्यरत फैसल बाबाला साहाय्य करत. चेन्नईमधील लोकांच्या ‘व्हिसा’शी संबंधित काम आणि विमानाचे तिकिट काढण्याचे कामही तो करत असे. आता अटक करण्यात आलेले अरुण आणि येसुदास केरळ अन् तमिळनाडू येथील विद्यार्थ्यांना रशियन सैन्यात भर्ती करण्याचे काम करत होते.
खासगी विजा आस्थापने विविध व्हिडिओ प्रसारित करून या युवकांशी संपर्क साधत आणि त्यांना विदेशात वेगवेगळ्या प्रकारच्या नोकर्या आहेत, असे सांगत. या प्रकरणी आतापर्यंत केंद्रीय अन्वेषण विभागाने देहली, अंबाला, चंडीगड, मुंबई, चेन्नई, मदुराई आणि थिरूवनतपूरम् या ७ शहरांतील १० ठिकाणांवर धाडी घातल्या आहेत.