पुणे जिल्ह्यातील लोकसभेचे उमेदवार मोहोळ, धंगेकर, बारणे आणि वाघेरे यांना निवडणूक आयोगाची नोटीस !

उमेदवारांनी सादर केलेल्या व्ययाच्या हिशोबामध्ये तफावत !

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातील ‘महायुती’चे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि ‘महाविकास आघाडी’चे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार व्ययाचा ताळेबंद व्ययाच्या दुसर्‍या पडताळणीमध्ये जुळत नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ६ मे या दिवशी त्यांना नोटीस पाठवली. यांच्यासह २ अपक्ष उमेदवारांनाही नोटीस पाठवली आहे.

उमेदवारांनी केलेल्या प्रचार व्ययाची दुसरी पडताळणी ६ मे या दिवशी पार पडली. आतापर्यंत रवींद्र धंगेकर यांच्या व्यय हिशोबामध्ये ११ लाख ६७ सहस्र ७०९ रुपयांची तफावत आढळून आली. मुरलीधर मोहोळ यांनी सादर केलेल्या ४९ लाख ३४ सहस्र ५८ रुपयांच्या व्ययामध्ये ३६ लाख २७ सहस्र ५८४ रुपयांची तफावत आढळून आली. मावळ लोकसभा मतदारसंघातील ‘महायुती’चे उमेदवार श्रीरंग बारणे आणि ‘महाविकास’ आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ केलेल्या व्ययामध्ये तफावत आढळून आली. श्रीरंग बारणे यांनी सादर केलेल्या व्ययामध्ये ३५ लाख ५७ सहस्र ३०८ रुपयांची तफावत आढळून आली. ‘वंचित’च्या माधवी जोशी यांच्या व्ययामध्ये २१ सहस्र १८० रुपयांची तफावत आढळून आली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस जारी केली आहे.