विकार आवरून नाम घ्यावे !

पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

परमार्थामध्ये शांती हा सर्वांत मोठा लाभ आहे. एकदा एक साधू आपल्या शिष्यास बरोबर घेऊन यात्रेला निघाले. वाटेत एक निंदक भेटला. त्याने साधूची पोटभर निंदा केली. तो साधू अगदी शांत नामामध्ये ती निंदा ऐकत होता. शिष्याने काही वेळ निंदा सोसली; पण पुढे तो घसरला आणि त्या निंदकाच्या भूमिकेवर पोचला. इतक्यात तो साधू तेथून दूर चालता झाला. शिष्याने त्या निंदकास सोडले आणि तो साधूच्या मागे मागे गेला. निंदक स्वतःच्या मार्गाने पुढे गेला. शिष्य म्हणाला, ‘अहो हे काय ! मला मध्येच सोडून तुम्ही निघून गेला.’ साधूने उत्तर दिले, ‘जोपर्यंत तू शांत होतास, तोपर्यंत तुझे नाम चालू होते. त्यामुळे श्रीराम तुझ्यामागे उभा असलेला मला दिसत होता; पण तू नाम विसरून घसरला, तेव्हा श्रीराम मागच्या पावली चालू लागला. म्हणून मीही त्याच्या मागोमाग गेलो.’

श्रीमहाराज ही गोष्ट सांगून म्हणत, ‘भगवंताच्या नामास शांतीचे थंड, मधुर जल घाला. त्याने ते झाड पुष्कळ फोफावेल. आपण त्याला कढत आणि विषारी विकारांचे पाणी घालतो. त्यामुळे ते झाड वाढत नाही. ते मरत नाही; कारण ते अमरकंद आहे; पण त्याची वाढ नको का व्हायला !’

– पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक सामर्थ्य’ या फेसबुकवरून साभार)