इ.व्ही.एम्. हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करणार्याला पुणे येथून अटक !
पुणे – ‘इ.व्ही.एम्. हॅक करतो’ म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे येथून मारुति ढाकणे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीला १ लाख रुपये घेतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. (लाचखोरांचा निवडणुकीतही हस्तक्षेप ! – संपादक) अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
आरोपी मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे इ.व्ही.एम्. आहेत, ते सर्व ‘हॅक’ करून तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत अंबादास दानवेंना भ्रमणभाष केला. त्यासाठी अडीच कोटी रुपये दानवे यांच्याकडे मागण्यात आले. या संदर्भात दानवे यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले. पुणे येथील एका हॉटेलमध्ये मारुति ढाकणे यांना पैसे घेतांना रंगेहात पकडले आहे.