Gaza Ceasefire : हमास युद्धविरामासाठी सिद्ध, इस्रायलला मात्र अटी अमान्य !
गाझातील रफाहमध्ये इस्रायलची आक्रमणे चालूच !
कैरो (इजिप्त) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन ७ महिने उलटले असून हमासने इजिप्त आणि कतार यांचा युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. यासंदर्भात त्याने ६ मे या दिवशी अधिकृत निवेदन प्रसारित केले. इस्रायलला मात्र या अटी मान्य नसल्याचे त्याने म्हटले आहे. यानंतर इस्रायलने युद्धाचा शेवटचा टप्पा चालू करत दक्षिण गाझामधील रफाहवरही आक्रमण केले.
१. हमासचा नेता इस्माईल हनीये याने कतारचे पंतप्रधान महंमद बिन अब्दुल रहमान अल्-थानी आणि इजिप्तच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केल्यानंतर युद्धविरामासाठीच्या अटी मान्य असल्याचे सांगितले.
२. हमासने म्हटले आहे की, आता निर्णय इस्रायलच्या हातात आहे की, तो युद्धविराम मान्य करतो कि नाही !
युद्धविरामासाठीचे हमासला मान्य असलेले ३ टप्पे !
‘अल्-जझीरा’ने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार हमासने स्वीकारलेल्या करारात तीन टप्प्यांत युद्धविराम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक टप्पा ४२ दिवसांचा असून ते टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :
पहिला टप्पा : इस्रायल गाझावरील आक्रमणे थांबवेल, तसेच सैन्य माघार घेईल. सध्या इस्रायली रणगाडे गाझा आणि इजिप्त यांच्या सीमेपासून २०० मीटर अंतरावर आहेत. हमास ३३ इस्रायली ओलीस सोडेल. प्रत्येक इस्रायली ओलिसाच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायल त्याच्या तुरुंगातून ३० पॅलेस्टिनींना मुक्त करील.
दुसरा टप्पा : उर्वरित इस्रायली ओलिसांच्या सुटकेवर लक्ष केंद्रीत केले जाईल. तसेच गाझामध्ये उपस्थित असलेले उर्वरित इस्रायली सैनिक परततील.
तिसरा टप्पा : मारल्या गेलेल्या इस्रायली ओलिसांचे मृतदेह परत देण्यात येतील. पुनर्वसनावर चर्चा होईल. इजिप्त, कतार आणि अमेरिका यावर लक्ष ठेवतील.
अमेरिकेने म्हटले की, अमेरिकी सरकार सध्या या प्रस्तावाचे पुनरावलोकन करीत आहे. इस्रायली ओलिसांची सुटका करणे, हे अमेरिकेचे प्राधान्य आहे. दुसरीकडे रफाहवरील आक्रमणांवरून अमेरिकेने इस्रायलकडे नापसंती व्यक्त केली आहे. ७ ऑक्टोबरच्या आक्रमणानंतर प्रथमच अमेरिकेने इस्रायलला पाठवण्यात येणारा दारूगोळा थांबवला आहे.