पंतप्रधान मोदी स्वत:ला ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणवून घेतात ! – डॉ. शशी थरूर, खासदार, राष्ट्रीय काँग्रेस
पुणे – आर्थिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा या सूत्रांवर केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणवून घेत त्यांनी श्रीराममंदिर, हिंदुत्व यांचा विषय पुढे आणला आहे; परंतु गेल्या १० वर्षांत रोजगार न मिळालेले मंदिराने कसे संतुष्ट होतील, असा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार डॉ. शशी थरूर यांनी उपस्थित केला. (श्रीराममंदिरामुळे सर्वच हिंदू आणि मानवजात यांना झालेला आध्यात्मिक लाभ वर्णनातीत आहे. असे असले तरी श्रीराममंदिरामुळे पहिल्याच दिवशी ५० सहस्र कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर त्यानंतरच्या दिवसांमध्ये लाखो कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. सहस्रोंना रोजगार मिळाला आहे. असे असतांना याला नाकारणे म्हणजे मूर्खपणा नव्हे का ? – संपादक) ते ‘महाविकास आघाडी’कडून पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ ‘युवा संवाद’ कार्यक्रमामध्ये बोलत होते.
थरूर पुढे म्हणाले, ‘‘नोटबंदीचा, जी.एस्.टी.चा फटका व्यावसायिकांना बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या. चीनही सीमेवर दबा धरून बसला आहे. त्यामुळे आता हिंदुत्व आणि श्रीराममंदिराच्या नावाने मते मागण्याची वेळ भाजपवर आली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांमध्ये पालट (फेरफार) केल्याचे पुरावे नाहीत. पुन्हा मतपत्रिकांवर मतदान घेणे, हे मागे नेणारे पाऊल आहे.’’
त्यामुळे ‘ई.व्ही.एम्.’वर शंका घेणार्यांना हा घरचा आहेरच आहे. ‘व्हीव्हीपॅट’ या यंत्रांची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी केली.