उभादांडावासियांकडून लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे
वेंगुर्ला – उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलकडे जाण्या-येण्याच्या मार्गावर झाडांची लागवड आणि सांडपाण्याचा चिखल यांमुळे विद्यार्थी अन् शिक्षक यांना त्रास होत आहे. हा त्रास लक्षात घेऊन ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी आदींनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते, तसेच येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने ३ मे या दिवशी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन वस्तूस्थितीची पहाणी केली. त्यानंतर शाळेकडे जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेत असल्याचे पत्र माजी विद्यार्थी, पालक आणि समस्त शिक्षणप्रेमी यांनी प्रशासनाला दिले आहे.