पूर्णवेळ साधना करण्यासंदर्भात साधकाने अनुभवलेली गुरुकृपा
मूळचे सातारा येथील आणि सध्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. दीपक गोडसे यांनी अनुभवलेली गुरुकृपा येथे पाहूया !
१. घरची प्रतिकूल परिस्थिती असूनही मुलांनी पूर्णवेळ साधना करावी’, अशी वडिलांची इच्छा असणे
घरी मी, आई, बाबा आणि भाऊ असे चौघांचे कुटुंब आहे. बाबा अनेक दिवसांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. आम्हाला संस्थेत आल्यापासून अनेक प्रसंगांत खरी गुरुकृपा अनुभवता आली. प्रतिकूल परिस्थिती आणि आर्थिक अडचणी (कर्ज) असतांनासुद्धा बाबांची एकच इच्छा होती की, ‘मी आणि रामदासदादाने (मोठा भाऊ) पूर्णवेळ साधना करावी.’
२. दोन वेळा आश्रमात सेवेनिमित्त जाण्याची संधी लाभणे; तेव्हा पूर्णवेळ साधना करण्याची साधकाच्याच मनाची सिद्धता नसणे
मी वर्ष २०१५ मध्ये काही दिवसांसाठी सेवेनिमित्त देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हाच बाबांनी ‘पूर्णवेळ साधना करण्याच्या दृष्टीने जाऊ शकतो’, असे सांगितले होते. तेव्हा माझ्या मनाची पूर्णवेळ साधना करण्याची सिद्धता नव्हती. काही दिवसांनी मी परत घरी आलो.
३. पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या बोलण्यातून त्यांची साधकांप्रतीची काळजी जाणवणे
एकदा घरी परत जाण्याआधी मला पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या समष्टी संत, वय ३४ वर्षे) यांनी भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी पू. (सौ.) अश्विनीताई मला म्हणाल्या, ‘‘आश्रमात लवकर परत ये.’’ तेव्हा मला वाटले की, ‘संतांनाही आपली किती काळजी आहे !’
४. प्रत्यक्ष साधनेत पूर्णवेळ होणे
रामदासदादाने रामनाथी आश्रमात सेवा करत असतांना पूर्णवेळ होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी पुढच्या वर्षी देवद (पनवेल) आश्रमात पूर्णवेळ झालो. तेव्हा बाबांनी आम्हाला सांगितले होते, ‘‘तुम्ही बाकी कसलाही विचार करू नका. आता साधना करून आनंदी रहा.’’
५. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आश्रमात विविध क्षेत्रांतील माहिती बारकाव्यांसह विनामूल्य शिकता येणे
पूर्णवेळ झाल्यानंतर दोघेही विद्युत् संबंधी सेवा करू लागलो. आम्हाला प्रत्यक्षात विद्युत् क्षेत्रातील काहीच माहिती नव्हती. आश्रमात सेवा करता करता विद्युत् क्षेत्रातील शिकता आले. देवाच्या कृपेने आश्रमात विविध सेवा शिकता आल्या. बाहेर एखाद्या क्षेत्रातील शिकायचे म्हटले, तर पुष्कळ पैसे भरावे लागतात; पण आश्रमात विनामूल्य सर्व क्षेत्रांतील माहिती बारकाव्यांसह शिकता येत आहे.
६. आश्रमात विविध सेवांच्या माध्यमातून नवीन कौशल्य आणि ज्ञान मिळणे
आश्रमात विद्युत् सेवेसह ‘पेंटिंग’, ‘प्लंबिंग’, सुतारकाम, बांधकाम आणि आता हळूहळू स्वयंपाकघरातील सेवाही शिकण्याची संधी मिळाली. सर्व सेवांच्या माध्यमातून नवीन कौशल्य आणि ज्ञान मिळत आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.’
– श्री. दीपक गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |