‘इसिस-केपी’चे वैश्विक संकट आणि भारताने घ्यावयाची दक्षता
‘इसिस’चा भारताला असलेला बहुआयामी धोकाभारताचे जागतिक पातळीवरील धोरणात्मक महत्त्व, लक्षणीय आर्थिक वाढ, सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वावर आधारलेली लोकशाही आणि मोठ्या प्रमाणात असलेली मुसलमान लोकसंख्या हे सगळेच घटक ‘इसिस-केपी’च्या रडारवर भारताला मुख्य देश बनवतात. ‘भारतावर आक्रमण करून इस्लामिक खिलाफत स्थापन करणे’, हे ‘इसिस’च्या जागतिक जिहादी अजेंड्यामधील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ‘इसिस-केपी’चा भारताला असलेला धोका निव्वळ रणनीती नसून वैचारिकही आहे, जी भारताच्या लोकशाही मूल्यांसमोरील मोठी समस्या आहे. ‘इसिस’चा भारताला असलेला धोका बहुआयामी आहे, ज्यात आतंकवाद, कट्टरतावाद, सांप्रदायिक हिंसाचार, सायबर आक्रमण यांसारखे धोके समाविष्ट आहेत. या गटाचे प्राथमिक लक्ष अफगाणिस्तान-पाकिस्तानात पाय रोवणे असले, तरीही त्याचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क, जिहादी विचारसरणी आणि जागतिक जिहादी ‘अजेंडा’ यांमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मात्र आहे. एका बाजूला धोरणात्मक कूटनीती, तर दुसर्या बाजूला मजबूत अंतर्गत सुरक्षा धोरण या मोदी सरकारच्या सूत्रांमुळे (‘फॉर्मुल्या’मुळे) भारतमातेविरुद्ध उभ्या असलेल्या असुरांना तोंड देण्यासाठी आजचा भारत नक्कीच सक्षम आहे ! – लेखिका : शांभवी प्रमोद थिटे, नवी देहली. |
‘इसिस-केपी ही ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस-केपी म्हणजे ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया – खोरासान प्रांत !) या आतंकवादी संघटनेची एक शाखा आहे, जी सध्या प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये दहशत निर्माण करतांना दिसते. खोरासान प्रांत हा पर्शियन साम्राज्याचा महत्त्वाचा भाग होता, जो आधुनिक काळात अनेक देशांमध्ये विभागला असून अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण आणि मध्य आशियाई देशांचे काही भाग यांत समाविष्ट आहेत. सुन्नी पंथियांचे वर्चस्व असलेला हा भाग भौगोलिक-राजकीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सीरियात गृहयुद्ध चालू असतांना वर्ष २०१३ मध्ये ‘इसिस’ची स्थापना झाली. वर्ष २०१४ पर्यंत ‘इसिस’ने जवळपास सगळाच पूर्व सीरिया हस्तगत केला. हे पाहून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील विविध आतंकवादी संघटनांच्या असंतुष्ट सदस्यांनी ‘इसिस’चा म्होरक्या अबू बकर अल-बगदादीशी निष्ठा ठेवण्याचे वचन दिले अन् ‘इसिस-केपी’ या गटाचा उगम झाला. ‘इसिस-केपी’च्या निर्मितीला अनेक राजकीय घटक कारणीभूत ठरले. इराक आणि सीरिया येथे झालेल्या ‘इसिस’च्या उदयाचा जगभरातील जिहादी गटांवर मोठा प्रभाव पडला. ‘इसिस’च्या कट्टरपंथीय इस्लामिक विचारसरणीने इतर प्रदेशांतील आतंकवाद्यांना प्रेरित केले आणि त्यांच्या कार्यात सामील करून घेतले.
१. ‘इसिस-केपी’चे उद्दिष्ट
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील आतंकवादी संघटनांमधील अंतर्गत विभाजन अन् नेतृत्व विवादांमुळे ‘इसिस-केपी’ला वेगळा जिहादी पर्याय शोधणार्या असंतुष्ट सैनिकांची भरती करण्याची संधी निर्माण झाली. अफगाणिस्तान-पाकिस्तान या प्रदेशात पाय रोवण्याच्या आणि मध्य पूर्वेच्या पलीकडे त्याचा प्रभाव वाढवण्याच्या मोहिमेचा प्रारंभ म्हणून जानेवारी २०१५ मध्ये या गटाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. ‘इसिस-केपी’चे उद्दिष्ट अफगाणिस्तान, पाकिस्तान, तसेच मध्य आशियातील वांशिक आणि सांप्रदायिक तणावाचे भांडवल करून तेथील सरकारांना आव्हान देऊन इस्लामिक राजवट निर्माण करणे, हे होते. ‘इसिस-केपी’च्या स्थापनेपासूनच विचारधारा ही खोरासान प्रदेशात तथाकथित इस्लामिक खिलाफत स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित आहे. या गटाने नागरिक, सुरक्षा दल आणि धार्मिक अल्पसंख्यांक यांवर केलेल्या क्रूर आक्रमणांमुळे, आत्मघाती बाँबस्फोट, हत्या आणि अपहरण यांसारखे डावपेच वापरून त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्वरित प्रसिद्धी मिळवली. ‘इसिस-केपी’च्या उदयामुळे आधीच अनेक दशकांपासून संघर्ष, आतंकवाद आणि अस्थिरतेने त्रस्त असलेल्या अफगाणिस्तान अन् पाकिस्तान येथील सुरक्षेची परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. या गटाच्या कृतींमुळे नागरी घातपात, विस्थापन आणि स्थानिक लोकांमध्ये व्यापक भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे या प्रदेशात मानवतावादी संकटे वाढली आहेत. ‘मध्य आशिया ते अगदी भारतातील काश्मीर खोर्यापर्यंत अशांतता निर्माण करणे आणि यादवी माजवणे’, हे ‘इसिस-केपी’चे उद्दिष्ट आहे.
२. ‘इसिस-केपी’ सध्या का चर्चेत आहे ?
२२ मार्च २०२४ या दिवशी संध्याकाळी झालेल्या प्राणघातक आतंकवादी आक्रमणाने रशिया हादरला. ४ बंदूकधार्यांनी एका संगीत कार्यक्रमाच्या वेळी मॉस्को येथील ‘क्रॉकस सिटी हॉल’मध्ये आक्रमण केले, ज्यात १४४ रशियन नागरिक मृत पावले. या आक्रमणाची वेळ अत्यंत महत्त्वाची होती; कारण पुतिन यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाचव्यांदा निवड झाल्याच्या ४ दिवसांतच हे आक्रमण झाले. या आधी वर्ष २०२१ मध्ये काबूल विमानतळाबाहेर घडलेल्या आक्रमणाचे दायित्व ‘इसिस-केपी’ने स्वीकारले होते. त्यात १७५ नागरिक आणि १३ अमेरिकन सैनिक ठार झाले होते. मे २०२० मध्ये काबूलमधील एका प्रसुती वॉर्डवर मोठे आक्रमण झाले होते, त्यात महिला आणि नवजात बालकांसह २४ लोक मारले गेले होते. यावरूनच ‘इसिस-केपी’च्या क्रौर्याची आपल्याला जाणीव होते. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये या गटाने काबूल विद्यापिठावर आक्रमण केले होते, ज्यात किमान २२ शिक्षक आणि विद्यार्थी ठार झाले. या वर्षाच्या प्रारंभीला इराणच्या आग्नेय भागात असलेल्या केर्मन शहरात जवळपास १०० लोक मारले गेले होते. ‘इसिस-केपी’ने केर्मन आक्रमणाचे दायित्व स्वीकारले होते.
‘इसिस’ आणि पुतिन यांचे वैर सर्वश्रुत आहे. सीरियाच्या गृहयुद्धात रशियाने सीरिया सरकारला ‘इसिस’ विरोधात मोठे साहाय्य पुरवले होते. तेव्हापासून रशिया ‘इसिस’च्या सूचीत वरच्या स्थानावर आहे. रशियातील अस्थिर भाग म्हणून ओळखला जाणारा कॉकेशस पर्वतांमधील चेचन्या, तसेच रशियन सीमेवर असलेल्या पूर्व युरोप, त्यासह मध्य आशियाई देशांतील अनेक युरेशियन मुसलमान ‘इसिस’च्या ‘प्रपोगंडा’ला (कार्यसूचीला) फसत गेल्याने रशियाने पूर्ण बळानिशी ‘इसिस’ विरोधात लढण्याचा विडा उचलला. मागील मासात झालेल्या आक्रमणातही आक्रमणकर्त्यांमध्ये मध्य आशियातील ताजिकिस्तान देशातील मुसलमानांचा समावेश आहे.
३. अफगाणिस्तानमधील राजकारण आणि वाढता आतंकवाद
ताजिकिस्तान हा मध्य आशियातील अतिशय गरीब देश. अफगाणिस्तानात ‘ताजिक’ हा दुसर्या क्रमांकाचा सर्वांत मोठा वांशिक गट आहे, तर ‘पश्तून’ हा सर्वांत मोठा वांशिक गट, तसेच तालिबान ही सध्या अफगाणिस्तानात सत्तेवर असलेली इस्लामिक संघटना या पश्तूनांच्या वर्चस्वाखाली कार्यरत आहे. ‘इसिस’ ही जिहादी संघटना अफगाणमधील ताजिक लोकांसारख्या अल्पसंख्यांकांना समवेत घेऊन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नांत आहे. एकेकाळी ताजिक गट हा तालिबान विरुद्ध लढण्यात पुढे होता. अनेक ताजिक हुतात्म्यांचा वापर करून सध्या ‘इसिस’ या ताजिक लोकांना तालिबानविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ‘इसिस’कडून मुद्दाम मध्य आशियातील सामाजिक-आर्थिक असमानता, राजकीय स्वातंत्र्याचा अभाव आणि जातीय तणावाला कंटाळलेल्या उपेक्षित लोकसंख्येला लक्ष्य केले जाते. यासह ‘अल कायदा’, ‘तेहरिक-ए-तालिबान’, ‘अफगाण तालिबान’ यांच्यातील अप्रसन्न म्होरक्यांचा आणि पाकिस्तानातील ‘आय.एस्.आय.’सारख्या संस्था ‘इसिस’कडे भूराजकीय संधीच्या दृष्टीने पहात असल्याने अनेक सुरक्षेशी संबंधित समस्या निर्माण होत आहेत.
४. भारतासाठी ‘इसिस-केपी’चा धोका आणि त्याने घ्यावयाची दक्षता
भारत-पाकिस्तान सीमेजवळील परिसरात, तसेच पाकिस्तानच्या मागासलेल्या खेड्यांमध्ये ‘इसिस-केपी’ने घुसखोरी करण्यास प्रारंभ केला आहे. ‘इसिस’साठी अवैध शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ पुरवणे, तसेच जिहादी कारवायांमध्ये अग्रेसर असणारे कट्टरपंथीय ‘स्लीपर सेल’ (छुपे गट) भारतातही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांनीही मागच्या वर्षात ‘इसिस’शी संबंधित ६५ आतंकवाद्यांना पकडले. देशभरातून पकडण्यात आलेल्या आतंकवाद्यांपैकी महाराष्ट्र आणि त्या पाठोपाठ केरळ येथून पकडण्यात आलेल्यांची संख्या अधिक आहे. ‘इसिस-केपी’ची अत्याधुनिक प्रचार यंत्रणा आणि ‘ऑनलाईन’ भरती धोरणे ही भारतीय धर्मांधांना कट्टरतावादी बनवण्यात प्रभावी ठरत आहेत. या गटाची जिहादी विचारधारा भारतातील कट्टरपंथीय इस्लामिक समाजातील तरुणांना भडकावून तिच्या गटात सामील करून घेण्यासाठी निष्पाप नागरिकांवर प्राणघातक आक्रमणे, बाँबस्फोट इत्यादी देशविघातक गोष्टी घडवून आणण्यासाठी प्रवृत्त करत आहे.
‘इसिस-केपी’च्या अजेंडामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणे समाविष्ट आहे. या गटाची जिहादी विचारधारा हिंदूंसह शिया मुसलमान, ख्रिस्ती आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्ध सांप्रदायिक हिंसाचाराला प्रोत्साहन देते. सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेला भारतीय समाज हा ‘इसिस-केपी’च्या रडारवर आहे. याखेरीज ‘इसिस-केपी’च्या इतर गटांसह असलेल्या युतीमुळे भारतीय हितसंबंधांवर आक्रमणे चालू करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्यासह ‘इसिस-केपी’चा प्रचार आणि भरतीसाठी वापरत असलेली सामाजिक माध्यमे अन् ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म’च्या वापरामुळे भारताला सायबर धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त ‘इसिस-केपी’द्वारे हिंदु समाजाविरुद्ध मुद्दाम पसरवण्यात येणारी चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांचा प्रसार सामाजिक विभाजन वाढवून अन् भारताच्या लोकशाही संस्थांसाठी समस्या निर्माण करू शकतो.
लेखिका : शांभवी प्रमोद थिटे, नवी देहली.
(लेखिका जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये ‘पीएच्.डी.’ करत आहेत.)
(साभार : शांभवी प्रमोद थिटे यांचे फेसबुक आणि दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)