झारखंडचे काँग्रेसचे मंत्री आलमीगर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरात सापडले ३० कोटी रुपये !
|
रांची (झारखंड) – झारखंडच्या ग्रामीण विकास मंत्रालयात निविदा अनुदान घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मोठी कारवाई केली. ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरावर घातलेल्या धाडीत ‘ईडी’च्या हाती ३० कोटी रुपये रोकड लागली आहे. याखेरीज मोठ्या प्रमाणात दागिनेही सापडल्याचे समजते. ‘ईडी’ने एकूण ६ ठिकाणी धाडी घातल्या आहेत.
राज्याचे निलंबित मुख्य अभियंता वीरेंद्र राम आणि त्यांच्या निकटवर्तियांच्या ठिकाणांवरही ईडी कारवाई करत आहे. काही योजनांच्या कार्यवाहीत अनियमितता आढळून आली आणि पैशांची अफरातफर झाल्याचा संशय बळावल्यावर ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वीरेंद्र राम यांना अटक केली होती. आता नव्याने घातलेल्या धाडींमुळे आलमगीर आलम यांना अटक होईल, असे बोलले जात आहे.
७० वर्षीय आलमगीर आलम यांच्यावरील संशय बळावला असून ते राज्यातील पाकूरचे काँग्रेसचे ४ वेळा आमदार होते. सध्या ते ग्रामविकास मंत्री आहेत. त्यांनी या प्रकरणी म्हटले की, माझे सचिव संजीव लाल हे याआधीही अन्य २-३ मंत्र्यांचे सचिव राहिले असून त्यांच्या नोकराच्या घरी एवढी रक्कम मिळाल्याविषयी मला काहीच ठाऊक नाही.
५ वर्षांपूवीचे प्रकरण !
मुळात हे प्रकरण वर्ष २०१९ मध्ये चालू झाले, जेव्हा सुरेश प्रसाद वर्मा नावाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या एका कनिष्ठ अभियंत्याला १० सहस्र रुपये लाच मागण्यावरूप अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याच्या घरून २ कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातही ईडीने मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्या २४ ठिकाणी धाडी घातल्या होत्या. यांत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची चौकशी चालू झाली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या मुख्य अभियंत्याच्या परिसरातून ३० लाख रुपयांखेरीज दीड कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, तसेच ईडीने त्यांची १०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती शोधून काढली होती.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचारी काँग्रेस ! आता अशा मंत्र्यांच्या मुसक्या आवळून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे अन् त्यांना आजन्म कारागृहात पाठवले पाहिजे ! |