सध्याच्या निवडणुका विकास विरुद्ध विद्वेष अशा होत आहेत ! – डॉ. नीलम गोर्हे, उपसभापती, विधान परिषद
कोल्हापूर, ५ मे (वार्ता.) – महायुतीने गेल्या १० वर्षांत प्रचंड विकासकामे केली आहेत. असे असतांना लोकसभा निवडणुकीतील प्रचारात सध्या वैयक्तिक टीका मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुका विकास विरुद्ध विद्वेष, अशा होत आहेत. उमेदवाराच्या पूर्वजांनी केलेल्या कामाची परतफेड म्हणून सध्याच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन करणे चुकीचे आहे. सध्या आपण पक्षीय पद्धत स्वीकारली असून राज्य आणि केंद्रातील सरकारने नेहमीच विकासाला महत्त्व दिले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केले. त्या कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
डॉ. नीलम गोर्हे पुढे म्हणाल्या, ‘‘कोल्हापूर शहरात आलेल्या महापुराच्या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी २ सहस्र ४०० कोटी रुपयांचे भरघोस साहाय्य केले आहे. शेतकर्यांसह सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम सरकारने केले आहे. नकारात्मक वृत्तांकनामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो का ? त्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. मतदान टक्केवारी काही प्रमाणात अल्प होत आहे हे खरे असून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘मतदान सक्तीचे केले पाहिजे’, असे नेहमी म्हणत. त्यामुळे नागरिकांनी आवर्जून मतदान केले पाहिजे.’’