मावळमधील (पुणे) ‘वंचित’च्या उमेदवारासह निवडणूक आयोगाची नोटीस !
निवडणूक खर्चाच्या हिशोबामध्ये तफावत दिसण्याचे प्रकरण
६ अपक्ष उमेदवारांनाही जारी केली नोटीस !
पिंपरी (जिल्हा पुणे) – मावळ लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित बहुजन आघाडी’च्या उमेदवार माधवी जोशी यांच्या प्रचार खर्चाच्या पहिल्या पडताळणीमध्ये तफावत दिसून आली आहे. त्याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी ४८ घंट्यांच्या आत खर्चाचा हिशोब सादर करण्याविषयी नोटीस पाठवली आहे, तसेच दैनंदिन खर्चाचे लेखे पडताळणीसाठी उपलब्ध करून न दिल्याने ६ अपक्ष उमेदवारांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार खर्चाची पहिली पडताळणी ३ मे या दिवशी करण्यात आली. त्यानुसार उमेदवारांकडे असलेल्या ‘शॅडो’मध्ये (नोंदवहीमध्ये) तफावत दिसून आली. वंचितच्या उमेदवार माधवी जोशी यांनी ७२ सहस्र १२५ रुपयांचा व्यय दाखवला आहे, तर निवडणूक विभागाच्या नोंदवहीमध्ये ९३ सहस्र ३०५ रुपये व्यय झाल्याची नोंद झाली आहे.