गोव्यात लोकसभा निवडणूक प्रचार थंडावला !
उद्या मतदान
पणजी, ५ मे (वार्ता.) – लोकसभा निवडणूक २०२४ साठीचा गोव्यात गेले एक महिना चालू असलेला प्रचार ५ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता थंडावला. लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघांसाठी ७ मे या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
भाजप विरोधात ‘इंडि’ आघाडीचे उमेदवार यांच्यामध्ये मुख्य लढत उत्तर आणि दक्षिण गोव्यातून प्रत्येकी ८ असे एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. उत्तर गोव्यात भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप, तर दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे अन् काँग्रेसचे उमेदवार वीरियातो फर्नांडिस यांच्यामध्ये मुख्य लढत आहे.
पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक
लोकसभा निवडणुकीसाठी ५ लाख ७१ सहस्र ६१७ पुरुष, ६ लाख ७ सहस्र ७१५ महिला आणि १२ तृतीयपंथी, ३०० ‘सर्व्हिस’ मतदार (विविध सेवांसाठी विविध कायद्यांन्वये पात्र असलेले मतदार) मिळून एकूण ११ लाख ७९ सहस्र ६४४ मतदार आहेत. राज्यात उत्तर गोवा मतदारसंघात ८६३, तर दक्षिण गोवा मतदारसंघात ८६२ मतदान केंद्रे मिळून एकूण १ सहस्र ७२५ मतदान केंद्रे आहेत.
राज्यात उत्तर गोव्यात ४ सहस्र ९७७, तर दक्षिण गोव्यात ४ सहस्र ४४६ असे एकूण ९ सहस्र ४२३ दिव्यांग (विकलांग) मतदार आहेत. ८ ते १९ वर्षे वयोगटातील १३ सहस्र २४४ मतदार उत्तर गोव्यात, तर १४ सहस्र ७८९ मतदार दक्षिण गोव्यात आहेत. ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील ६ सहस्र २८९ मतदार उत्तर गोव्यात, तर ५ सहस्र २१६ मतदार दक्षिण गोव्यात आहेत.