मतदानाच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश
रत्नागिरी – मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, यासाठी मतदानाच्या दिवशी मंगळावर, ७ मे या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
४६-रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ७ मे या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरवण्यात येतो, त्या ठिकाणी मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरता बाजार आणि जत्रा अधिनियम १९६२ चे कलम ५ (ग) मधील प्रावधानानुसार जिल्ह्यामधील मंडणगड तालुक्यातील देव्हारे, लाटवण; दापोली तालुक्यातील विसापूर; खेड तालुक्यातील भरणे; चिपळूण तालुक्यातील वहाळ; संगमेश्वर तालुक्यातील कडवई, तुळसणी, फुणगुस, वांद्री; रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, मालगुंड, चांदोर; राजापूर तालुक्यातील कात्रादेवी आणि लांजा येथील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.