मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज ! – जिल्हाधिकारी
कोल्हापूर, ५ मे (वार्ता.) – ७ मे या दिवशी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणार्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. दोन्ही मतदारसंघात मिळून ३ सहस्र ९८६ मतदान केंद्रांचा वापर करण्यात येणार आहे. कोल्हापूर मतदारसंघासाठी १९ लाख ३६ सहस्र मतदार असून हातकणंगले मतदारसंघासाठी १८ लाख १४ सहस्र मतदार आहेत. ‘सी व्हिजील’ ॲपवर आतापर्यंत ९९ तक्रारी नोंद झाल्या असून त्यातील ३९ दखलपात्र नसल्याने त्या वगळण्यात आल्या. उर्वरित ६० तक्रारींवर कारवाई करून संबंधितांना कळवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ते ७ मेला असलेल्या मतदानानिमित्ताने पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच सर्वाधिक मतदान होते. यंदाही मतदान वाढीसाठी गेल्या दीड महिन्यांपासून प्रशासनाच्या वतीने विविध संकल्पना राबवण्यात आल्या असून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही काही मतदान केंद्रांवर विशेष संकल्पना राबवण्यात येणार आहेत. मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक किमान सुविधांसह, मनुष्यबळ पुरवठा याबाबतची कामे पूर्ण झाली असून निर्विघ्न आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान होण्यासाठीची सिद्धता झाली आहे. उष्ण हवामानात मतदारांच्या रांगा बसण्याच्या व्यवस्थेसह सावलीत असतील, पिण्याच्या पाण्याची, ‘ओ.आर्.एस्.’ची व्यवस्था तसेच मदतीसाठी स्वयंसेवक असतील.’’