तळमळीने सेवा करणार्या बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील श्रीमती अर्चना ठाकूरदेसाई (वय ७८ वर्षे) !
‘मी (श्री. गजानन रामचंद्र धाक्रस) साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. मला सनातन संस्थेचे कार्य आवडते. ‘सनातन प्रभात’ मध्ये छापून आलेला अनेक साधकांचा साधनाप्रवास वाचून मला माझ्या बहिणीविषयी (श्रीमती अर्चना अरविंद ठाकूरदेसाई (वय ७८ वर्षे) हिच्याविषयी) चार शब्द लिहावेसे वाटले.
१. माहेरच्या कुटुंबातील सुसंस्कृत आणि धार्मिक वातावरण
माझी बहीण अनुमाने ६० वर्षे ग्रामीण भागात रहात होती. आमचे वडील माध्यमिक शाळेत शिक्षक होते. आमच्या कुटुंबात सुसंस्कृत आणि धार्मिक वातावरण होते. अर्चनाताईने लहानपणी आई-वडिलांची सेवा मनापासून केली. तिने देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून मंत्रजप केले आहेत.
२. कौटुंबिक दायित्व निभावणे
तिच्या लग्नानंतर ती सासरच्या कुटुंबातही सुसंस्कारी आणि धार्मिक वातावरणात कौटुंबिक आयुष्य जगत होती. तिचा स्वभाव प्रेमळ आहे. तिच्या वाणीत गोडवा आहे आणि तिच्यात इतरांसाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे. तिने तिच्या सासर्यांची पुष्कळ सेवा केली. तिच्या सासू-सासर्यांचे निधन झाल्यानंतर आणि मुलींची लग्ने झाल्यानंतर त्या दुर्गम खेडेगावात ती एकटी रहात होती. नंतर तिच्या मुलाने तिला बदलापूर येथे त्याच्या घरी आणले.
३. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना पूर्वी ती श्री गजानन महाराजांची उपासना करत होती.
४. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे
आमची बहीण सौ. स्मिता प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७६ वर्षे) ही राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथे रहाते. ती सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. तिने अर्चनाताईला साधनेसाठी प्रोत्साहन दिले. अर्चनाताईचा नामजप होऊ लागला. स्मिताताईने अर्चनाताईला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू करून दिले. अर्चनाताई खेडेगावात रहात असतांना तिला सेवा करायला वेळ मिळत नसे. ती येणार्या-जाणार्यांना नामजपाचे महत्त्व सांगत असे. ती बहिणीकडे गुरुपौर्णिमेला किंवा सनातन संस्थेचा कार्यक्रम असल्यास सेवेला जात असे.
५. सेवेची तळमळ
५ अ. ती बदलापूर येथे रहायला आल्यावर घरची कामे आटोपल्यावर उर्वरित वेळेचा सदुपयोग व्हावा; म्हणून अध्यात्मप्रचार करण्यासाठी ती रहात असलेल्या संकुलात जात असे. नंतर ती उत्तरदायी साधिकांनी सांगितल्यानुसार अर्पण घेण्याची सेवा करू लागली.
५ आ. उतारवयातही जिद्दीने भ्रमणभाषचा वापर करण्यास शिकणे : कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे तिला बाहेर जाणे जमत नव्हते. त्या वेळी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले. तेव्हा अर्चनाताईकडे ‘स्मार्टफोन’ नव्हता. तिच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने सौ. स्मिताताईने तिला ‘स्मार्ट फोन’ घेऊन दिला. अर्चनाताईचे शिक्षण मराठी सातवी इयत्तेपर्यंतच झाले असल्याने आणि तिला इंग्रजी कळत नसल्यामुळे ‘ती ‘स्मार्टफोन’ कसा वापरेल ?’, अशी मला शंका वाटत होती. अर्चनाताई चिकाटीने आणि जिद्दीने भ्रमणभाषचा वापर करण्यास शिकली अन् सनातनचे सत्संग आणि प्रवचने भ्रमणभाषवर ऐकू लागली.
५ इ. अर्चनाताईचे वय ७८ वर्षे आहे. तिला दम्याचा त्रास आहे. ती तिसर्या माळ्यावर रहाते. ती वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावते. ती सणांच्या पवित्र दिवशी दिवसभर सेवा करते.
५ ई. सेवेतून आनंद मिळणे आणि सेवेविना अन्य कुठेही जाण्याची इच्छा नसणे : ती म्हणते, ‘‘मला इतरांसारखे काहीच करता येत नाही. मी तरुणपणी सेवा करू शकले नाही. आता गुरुदेवांनी संधी दिली आहे, तर तेच करून घेतील.’’ ती असा भाव ठेवून नामस्मरण आणि प्रार्थना करत सेवेला जाते. तिला सेवेतून पुष्कळ आनंद मिळतो. तिला सेवेविना अन्य कुठेही जाण्याची इच्छा नसते.
६. धनाचा त्याग करणे
तिला कुणी पैसे दिल्यास ते ती स्वतःसाठी न ठेवता गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण म्हणून देते. एकदा तिला तिच्या लंडन येथे रहाणार्या भाच्याने काही रक्कम भेट दिली. तिने ते सर्व पैसे गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण केले.
७. शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करण्याची इच्छा असणे
तिची संसाराची आसक्ती नष्ट झाली आहे. तिला आश्रमात रहाण्याची पुष्कळ इच्छा होती; पण ती म्हणते ‘‘आता म्हातारपणी मी आश्रमात जाऊन काय करणार ?’’ तिने ‘येथेच राहून जमेल तेवढी सेवा करायची’, असे ठरवले आहे. तिला सेवा करून हा देह गुरुचरणांवर अर्पण करायचा आहे. ‘ईश्वराने तिची ही इच्छा पूर्ण करावी’, अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.’
– श्री. गजानन रामचंद्र धाक्रस (श्रीमती अर्चना यांचा भाऊ, वय ६४ वर्षे), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२.४.२०२४)