Adani Group Philippines Port:अदानी समूह फिलिपिन्समधील बंदर विकसित करणार !
नवी देहली – अदानी समूहाचे आस्थापन ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड’ आता फिलिपिन्समध्ये गुंतवणूक करण्याच्या सिद्धतेत आहे. फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अदानी पोर्ट्सने फिलीपिन्समधील बातान येथे २५ मीटर खोल बंदर विकसित करण्यात स्वारस्य दाखवले आहे. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद मार्कोस ज्युनियर यांनी फिलिपिन्समधील अदानी बंदरे आणि विशेष आर्थिक क्षेत्र योजनेचे स्वागत केले आहे.
अलीकडेच गौतम अदानी यांचा मुलगा आणि ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनियर यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली होती. भारताव्यतिरिक्त अदानी पोर्ट्स श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल या देशांमध्ये कार्यरत आहे.