श्री. सुदीश पुथलत यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
१. साधकांवर योग्य आणि विचारून कृती करण्याचा संस्कार करणे
१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांवर ‘कोणतीही कृती विचारून करायला हवी’, हा संस्कार करणे : ‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) प्रत्येक कृतीमध्ये आम्हा साधकांची साधना झाली पाहिजे’, हे शिकवण्याचा प्रयत्न असायचा. प.पू. गुरुदेवांचे साधकांना शिकवणे भावनिक स्तरावर कधीच नव्हते. मी आणि माझी पत्नी सौ. सुमा सेवाकेंद्रात सेवा करण्यासाठी जाऊ लागलो. तेव्हा एकदा सेवाकेंद्रातील दिवा (बल्ब) बंद पडला होता. तेव्हा मी त्वरित बाहेर जाऊन एक नवीन दिवा आणून लावला. जेव्हा प.पू. गुरुदेवांना हे समजले. तेव्हा त्यांनी मला त्वरित तो पालटलेला दिवा परत घेऊन जाण्यास सांगितले; कारण मी ही कृती माझ्या मनानेच त्यांना न विचारता केली होती. या प्रसंगात माझ्या असे लक्षात आले की, ‘मनाने करणे’ ही गोष्ट साधनेच्या विरुद्ध कृती असून ती माझ्याकडून झाली होती. त्यामुळे प.पू. गुरुदेवांनी मला तो दिवा परत करायला सांगितले होते. प.पू. गुरुदेवांनी कोणतीही कृती ‘विचारून करणे’ याचा संस्कार आरंभीपासूनच साधकांमध्ये निर्माण केला होता.
१ आ. प्रत्येक कृती योग्य आणि विचारपूर्वक करायला हवी, हे शिकायला मिळणे : साधारण वर्ष १९९७ मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त एका अन्य केंद्रातील साधकांनी आम्हाला (मला आणि माझी पत्नी सौ. सुमा) पूजेला बसण्यासाठी सांगितले. त्या काळात संस्थेचे साधक मोजकेच होते. आम्हाला पूजेला बसल्याने पुष्कळ आनंद मिळाला. आम्ही गुरुपौर्णिमा उत्सवाची छायाचित्रे प.पू. गुरुदेवांना दाखवत होतो. तेव्हा त्यांनी आमचे कौतुक केले. त्यानंतर जेव्हा आम्ही पूजेला बोलवणार्या साधकांना आम्ही भेटलो, तेव्हा त्या साधकांनी सांगितले, ‘‘प.पू. गुरुदेवांनी आम्हाला आमची चूक सांगितली की, ‘अन्य केंद्रातील साधकांना तुम्ही बोलवायला नको होते. आपल्याच केंद्रातील साधकांना पूजेला बसवायला पाहिजे होते.’’ या प्रसंगातून मला हे शिकायला मिळाले की, ‘आम्ही दोघांनी साधनेला आरंभ केला होता. त्या केंद्रातील नवीन साधक जोडप्याला पूजनाची संधी दिली असती, तर त्यांना त्यातून आनंद मिळाला असता अन् साधनेसाठी प्रेरणाही मिळाली असती.
२. पूर्णवेळ साधना करणार्या साधकाची सर्व प्रकारे काळजी घेणे
२ अ. प.पू. गुरुदेवांचा संकल्प आणि कृपाशीर्वाद यांमुळेच नातेवाइकांना सोडून दुसर्या गावी सेवेसाठी जाण्याची कृती सहज होणे : एकदा प.पू. गुरुदेवांनी आम्हा दोघांना (मी आणि माझी पत्नी सौ. सुमा हिला) साधनेसाठी केरळला जाण्यास सांगितले. खरेतर आम्ही मुंबईमध्ये लहानाचे मोठे झालो होतो. आमचे सर्व नातेवाईक मुंबईतच होते. मुंबई सोडणे आमच्यासाठी एवढी सहज आणि सोपी गोष्ट नव्हती, तरीही सर्वांना सोडून जाणे आमच्याकडून अत्यंत सहज आणि सोपे झाले. यावरून माझ्या असे लक्षात येते की, ‘यामध्ये आमचे स्वतःचे असे काहीच प्रयत्न नव्हते. केवळ आणि केवळ प.पू. गुरुदेवांचा संकल्प आणि कृपाशीर्वाद यांमुळेच हे सर्व एवढ्या सहजतेने झाले.’
२ आ. मायेतील सर्वस्वाचा त्याग करून साधना करतांनाही गुरुदेवांच्या कृपेने कधीच ‘असुरक्षितेची भावना’ न जाणवणे : पूर्वी साधकांनी पूर्णवेळ साधना करण्याचे प्रमाण अल्प होते. त्या वेळच्या साधकांमध्ये ‘आमचे पुढे कसे होईल ?’, असा संघर्ष असल्याने ते पूर्णवेळ न होता नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून साधना करत असत. आम्ही सर्व सोडून आमच्या मुलाला घेऊन केरळला गेलो. काही वर्षांनंतर माझ्या मनात एक विचार आला की, एवढ्या वर्षांमध्ये आमच्यापैकी कुणालाही कधीच ‘असुरक्षितेची भावना’ आली नाही. ‘आपले पुढे कसे होणार ?’, असा विचार कधीच आमच्या मनात आला नाही. यावरून एक गोष्ट लक्षात आली की, ‘प.पू. गुरुदेवांनी आम्हाला सांगितल्यावर मनात कोणताही किंतु न येता आम्ही साधनेसाठी केरळला गेल्याने गुरुदेव आमच्या साधनेची पूर्ण काळजी घेत होते. त्यांनी आमच्यावर केवढी अपार कृपा केली होती.
३. व्यष्टी आणि समष्टी यांपैकी कोणत्याही प्रकारची साधना होत नसण्याची परिस्थिती आल्यावर ‘प.पू. गुरुदेवांचे चरण घट्ट पकडून ठेवायचे’, असे आधुनिक वैद्या (सौ.) रश्मी नल्लादारू यांनी सांगणे
आरंभी मुंबईमध्ये आम्ही बर्याच ठिकाणी सत्संगाला जात होतो. तसेच एकदा आम्ही माटुंगा येथील एका सत्संगाला गेलो होतो. सत्संग झाल्यानंतर आधुनिक वैद्या (सौ.) रश्मी नल्लादारू आणि आम्ही बोलत बोलत रेल्वेस्थानकाकडे जात होतो. अकस्मात् त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘पुढच्या काळात जर ‘आपली व्यष्टी आणि समष्टी यांपैकी कोणत्याही प्रकारची साधना होत नाही’, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपण केवळ एकच गोष्ट करायची, ‘प.पू. गुरुदेवांचे चरण घट्ट पकडून ठेवायचे.’ असे केल्यामुळे ते आपल्याला संपूर्णपणे तारतील.’’ जेव्हा जेव्हा मला या प्रसंगाचे स्मरण होते, तेव्हा ‘हे अटळ सत्य ईश्वरानेच त्यांच्या तोंडून माझ्या साधनेसाठी वदवून घेतले होते’, असे मला जाणवते.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– श्री. सुदीश पुथलत (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/791333.html