कर्करोगाशी लढणार्या पुणे येथील ‘दिव्यांश’ची कहाणी ‘ब्लेझ : एका पुत्राची अग्नीपरीक्षा’ या पुस्तकाने प्रकाशित !
कर्करोगामुळे २२ व्या वर्षी मृत्यू !
पुणे – ‘दिव्यांश’ या १२ वर्षे वयाच्या मुलाला रक्ताचा कर्करोग झाला. त्या आजाराने खचून न जाता, आई-वडिलांना धीर देत दिव्यांशने कर्करोगाशी १० वर्षे लढा दिला. अवघ्या २२ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. कर्करोगाशी लढणार्या दिव्यांशचा प्रवास आई सौ. निधी पोद्दार आणि वडील श्री. सुशील पोद्दार यांनी लिहिलेल्या अन् भारती पांडे यांनी अनुवादित केलेल्या रूपा प्रकाशनाकडून ‘ब्लेझ : एका पुत्राची अग्नीपरीक्षा… एक सत्यकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते सचिन पिळगांवकर, अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी, लेखिका डॉ. अरुणा ढेरे, आई सौ. निधी पोद्दार, वडील श्री. सुशील पोद्दार आणि अनुवादक भारती पांडे आदी उपस्थित होते. हा प्रकाशन सोहळा ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या ‘माधवराव पटवर्धन सभागृहात’ झाला.
अभिनेते सचिन पिळगांवकर म्हणाले, ‘‘दिव्यांशच्या जगण्याची लढाई ही केवळ एकट्या दिव्यांशची नव्हती, तर ती संपूर्ण कुटुंबाची होती. पारंपरिक उपचारांच्या पुढे जाऊन या कुटुंबाने दिव्यांशच्या दीर्घायुष्यासाठी प्रयत्न केले. आज तो शरीर रूपाने आपल्यात नसला तरी या पुस्तकाच्या रूपाने त्याच्या आई-वडिलांनी त्याला अमर केले आहे.’’