श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा !
तळेघर (जिल्हा पुणे) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ४ दिवसांचा महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात झाला. संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा ‘ज्योतिर्लिंग पुरस्कार’ या वर्षी वेदमूर्ती डॉ. वंशी कृष्ण घनपाठी (म्हैसूर), ह.भ.प गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे (साधकाश्रम देवाची आळंदी), महंत जगदीशगिरी महाराज (आजीवन महामंत्री श्री पंचदशनाम जुना आखाडा क्षेत्र भीमाशंकर) योगी फुलनाथ बाबा (टाकेश्वर मठ संगम कर्जत) यांना बालयोगी गणेशनाथ महाराज आणि देवस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानाचे पुजारी गोरक्ष कौदरे यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक यांचाही सत्कार करण्यात आला.
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
‘भीमाशंकर ग्रामस्थ रुद्र स्वाहाकार समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने संतत जलधारा, रुद्राभिषेक, रुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते. या वर्षी २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत हा कार्यक्रम झाला. चालू वर्षी या कार्यक्रमाचे हे ४६ वे वर्ष होते. स्वाहाकार काळात मंदिर २४ घंटे उघडले जाते, शिवलिंगावर संतत जलधारा आणि महारुद्र पठण चालू असते, तसेच प्रतिदिन होमहवन, रूद्राभिषेक, प्रवचन, आरती, महाप्रसाद असा कार्यक्रम होतो.
या वेळी ‘बालयोगी पिरजी गणेशनाथ महाराज माँ शारदा प्रबोधिनी’चे अध्यक्ष पांडुरंग महाराज येवले, भीमाशंकर देवस्थानाचे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे, रुद्रस्वाहाकार समितीचे अध्यक्ष वेदमूर्ती मधुकरशास्त्री गवांदे, उपाध्यक्ष चंद्रकांत कौदरे, विश्वस्त दत्तात्रय कौदरे, गोरक्ष कौदरे, भीमाशंकरचे सरपंच दत्तात्रय हिले आदी उपस्थित होते.