‘डिपफेक’ विरोधात पोलिसांकडे त्वरित तक्रार करा ! – महाराष्ट्र पोलीस

मुंबई – महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून ‘डिपफेक’च्या विरोधात पोलिसांकडे त्वरित तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये ‘डिपफेक असलेल्या फसवे व्हिडिओ आणि ऑडिओ यांपासून सावध रहा. ‘डिपफेक’चा अनुभव आल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा’, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ‘डिपफेक’ व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे ‘एक्स’ खाते चालवणार्‍यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांनाही पोलिसांनी सतर्कतेची सूचना दिली आहे.

‘डिपफेक’ म्हणजे काय ?

‘डिपफेक’ म्हणजे संगणक किंवा भ्रमणभाष यांवरील ॲप यांद्वारे एका व्यक्तीच्या शरिरावर अन्य व्यक्तीचा मुखवटा लावणे. यामध्ये मुखवटा आणि शरीर हे भिन्न व्यक्तींची असली, तरी इतक्या अचूकतेने जुळवले जाते की, सहजासहजी लक्षात येत नाही. सद्य:स्थितीत  अश्लील छायाचित्रांना अन्य महिलांचा मुखवटा लावून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याचे प्रकार वाढले आहेत. याविषयीच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे विशेषत: महिलांना त्यांची छायाचित्रे माध्यमांवरून प्रसारित करतांना ती ‘डाऊनलोड’ करता येणार नाहीत किंवा त्यांचा दुरुपयोग करता येणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जाते.