तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही समष्टी सेवा करून घेऊन आध्यात्मिक उन्नती करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘५.११.२०१० या दिवशी मी संतपदी विराजमान झालो आणि १९.७.२०१६ या दिवशी मला सद्गुरुपद प्राप्त झाले. या कालावधीत मला तीव्र शारीरिक त्रास झाले. आताही मला शारीरिक त्रास होतात; पण त्यांची तीव्रता पुष्कळ न्यून झाली आहे. त्या तीव्र शारीरिक त्रासाच्या कालावधीतही गुरुमाऊलींनी माझ्याकडून साधना करून घेतली. संतपदी विराजमान झाल्यावर मी एक वर्ष प्रचारात सेवा करत होतो. या कालावधीतच माझी शारीरिक स्थिती पुष्कळ खालावली. अशा स्थितीत कुणी समष्टी साधना करूच शकणार नाही; परंतु सर्व शक्तीमान आणि सामर्थ्यवान अशा श्री गुरूंना काहीच अशक्य नसते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी श्री गुरु साधक आणि शिष्य यांच्याकडून त्यांना अपेक्षित अशी साधना करून घेतात अन् त्यांना साधनेतील पुढच्या पुढच्या टप्प्याला घेऊन जातात. ज्यांना ‘शारीरिक त्रासांमुळे साधना होत नाही’, असे वाटते, त्यांना हा लेख वाचून ‘शारीरिक अडचणी साधनेत अडथळा बनू शकत नाहीत’, हे लक्षात येईल आणि त्यांना जोमाने साधना करण्याची प्रेरणा मिळेल. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी माझ्याकडून कठोर साधना करून घेऊन मला केवळ सद्गुरुपदी विराजमान केले नाही, तर माझे तीव्र प्रारब्ध सुसह्य केले. याविषयी मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
(भाग १४)
१. संतपदी विराजमान झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील विविध जिल्ह्यांमध्ये दौर्यावर जाणे
मी दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या ४ राज्यांमध्ये धर्मप्रचाराची सेवा करत होतो. मी संतपदी विराजमान झाल्यावर काही मास कर्नाटक येथे प्रचारसेवा केली. एप्रिल २०११ पासून प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मी महाराष्ट्राच्या विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, तसेच नाशिक अन् जळगाव या जिल्ह्यांचा दौरा केला. दौर्यामध्ये त्या त्या गावातील साधकांना वैयक्तिक संपर्क करणे, त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे सत्संग घेणे इत्यादी सेवा करत असे.
२. शारीरिक त्रास चालू झाल्यावर आधी ठाणे आणि नंतर देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात परत येणे
नोव्हेंबर २०११ मध्ये ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांचा दौरा करतांना माझे शारीरिक त्रास पुष्कळ वाढले. कंबर आणि पाठ यांच्या दुखण्यामुळे मला बसताही येईनासे झाले. माझी मानही पुष्कळ दुखत होती. त्यामुळे हा दौरा अर्धवट सोडून मी ठाणे सेवाकेंद्रात उपचारांसाठी गेलो. तेथे उपचार चालू असतांनाच प.पू. गुरुदेवांनी मला साधकाकरवी निरोप पाठवला, ‘तुम्ही लगेचच देवद आश्रमात जा.’ त्यांच्या आज्ञेचे पालन करत मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेलो.
३. स्वतःला होत असलेले शारीरिक त्रास !
शारीरिक दुखण्याची तीव्रता वाढल्यामुळे मला थोडा वेळही बसता येत नव्हते. त्यामुळे मला सतत झोपून रहावे लागत होते. मी केवळ नित्यकर्म आणि प्रसाद-महाप्रसाद यांसाठी कसाबसा उठून बसायचो. दिवसभर मी पलंगावर झोपून रहायचो. आश्रमात माझ्यावर विविध प्रकारचे उपचार चालू होते; परंतु त्याला माझ्या शरिराकडून विशेष प्रतिसाद मिळत नव्हता. मी कंबरेला पट्टा लावून ४ – ५ मिनिटे उभा राहिलो, तरी माझी कंबर दुखायची. माझे जेवणही पुष्कळ न्यून झाल्यामुळे मला पुष्कळ अशक्तपणा आला. माझे हात-पाय थंड पडत असत. माझ्या स्नायूंचे बळ एवढे न्यून झाले की, ‘मला दैनिक ‘सनातन प्रभात’ही हातात धरून वाचता येत नव्हता. एक साधक मला ते वाचून दाखवत असे.’
४. वैद्यकीय तपासणीत ‘बांबू स्पाईन’ची लक्षणे आहेत’, असे कळणे
माझी वैद्यकीय तपासणी केल्यावर मला ‘बांबू स्पाईन’ची लक्षणे चालू झाली आहेत’, असे कळले. यात पाठीचा मणका हळूहळू बांबूसारखा ताठ आणि कडक होण्यास आरंभ होतो. त्यामुळे व्यक्तीला बसणे, झोपणे आणि झोपल्यावर उठून बसणे इत्यादी कृती करणे पुष्कळ कठीण अन् वेदनादायक होते.
५. शारीरिक त्रासात झालेली वाढ !
पुढे पुढे माझ्या शारीरिक त्रासात पुष्कळ वाढ झाली. माझी शरिराची उजवी बाजू, म्हणजे मानेच्या उजव्या भागापासून उजव्या पायाच्या टाचेपर्यंत सर्व भाग पुष्कळ दुखायचा. मला उजवा पाय वर करता येत नसे. माझे पाठीचे १० मणकेही उजव्या बाजूला सरकले होते. उजवीकडील पाठीवरील स्नायू घट्ट झाले होते. तिथे आणि मान यांवर पुष्कळ सूज येऊन वेदना होत होत्या. पाठीवर झोपल्यावर उजव्या पायात ताण यायचा आणि पाय अन् कंबर जखडायची. डाव्या कुशीवर झोपल्यावर उजव्या बाजूला पुष्कळ दुखायचे. त्यामुळे सतत एकाच उजव्या कुशीवर झोपावे लागायचे. तसे झोपल्यावरही मान किंचित हालवली, तरी मानेत कळा यायच्या.
६. निसर्गाेपचारतज्ञ दीपक जोशी यांनी केलेले उपचार !
निसर्गाेपचारतज्ञ दीपक जोशी यांनी माझ्यावर एक वर्ष उपचार केले. माझे सरकलेले मणके बसवण्यासाठी ते आदल्या रात्री माझ्या पूर्ण पाठीला खजुराचा जाड लेप लावत. तो लेप सकाळी काढायचा. नंतर ते मणके आणि नसा यांवर कांदे लावून त्यावर विशिष्ट दाब देऊन मणके जागेवर आणण्याचा प्रयत्न करायचे. सर्व मणके एका सरळ रेषेत आणण्यासाठी एका वेळी सरासरी २५ – ३० कांदे लागायचे. आरंभी आठवड्यातून दोनदा हे उपाय केले जायचे. प्रत्येक वेळी उपचार करून मणके जागेवर आणल्यानंतर २ – ३ दिवसांतच ते पुन्हा त्यांची जागा सोडायचे. त्यामुळे सतत उपचार करावे लागायचे. असे उपचार जवळपास वर्षभर केले. हे उपचार अतिशय कष्टदायक होते.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |