स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटामुळे जगाला युगपुरुषाची ओळख !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रसारित झाला. या चित्रपटाची सर्व माध्यमांमध्ये पुष्कळ चर्चा झाली. त्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका बघतांना आपल्या समोर प्रत्यक्ष सावरकर आले आहेत, असे वाटते. सावरकर कसे होते ? ते कसे दिसत होते ? त्यांचा त्याग, समर्पण हे सत्यात उतरवण्याचे शिवधनुष्य उचलण्याचे कार्य अभिनेते श्री. रणदीप हुडा यांनी या चित्रपटातून केले. यानिमित्त ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी या चित्रपटाविषयीचे अनुभव आणि व्यक्त केलेल्या भावना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसमोर ठेवत आहोत.
१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चित्रपट निर्मिती करण्याची प्रेरणा रणदीप हुडा यांना कशी मिळाली ?
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात सावरकर यांची भूमिका करण्यासाठी मला विचारले गेले, तेव्हा मला त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. तेव्हा ‘मला ही माहिती का नाही ?’, असा प्रश्न माझ्या मनात आला. त्यानंतर मी त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. ते करत असतांना माझ्या लक्षात आले की, ‘सशस्त्र क्रांती’ विषयी कुठेही फारसा उल्लेख दिसून येत नाही. याविषयी शालेय अभ्यासक्रमात केवळ १-२ परिच्छेदातच माहिती देण्यात आली आहे. ‘त्यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात विशेष सहभागच नव्हता, तर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा का देण्यात आली ? इतक्या लोकांना फाशी का दिली गेली ? लोकांना तोफेच्या तोंडी का दिले असेल ?’, असे विविध प्रश्न मला पडले. त्यानंतर मी अधिक प्रमाणात संशोधन करणे चालू केले. तेव्हा मला त्यांनी केलेले महान कार्य समजले.
स्वातंत्र्यवीर सावरकर सर्व सशस्त्र क्रांतीकारकांचे प्रेरणास्थान होते. चापेकर बंधू, लोकमान्य टिळक, मॅडम भिकाजी कामा (ज्यांनी भारताचा ध्वज विदेशात फडकावला होता.), मदनलाल धिंग्रा, खुदीराम बोस, अनंत कान्हेरे अशा अनेक क्रांतीकारकांनी त्यांच्या जीवनाचे बलीदान दिले होते. त्या सर्वांचे प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्यामुळे मी काही झाले, तरी सावरकर यांची कहाणी लोकांपर्यंत पोचवणारच, असा निश्चय केला आणि त्यांच्या जीवनातील काळ्या पाण्याची शिक्षा, जामीन याचिका अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी या चित्रपटात घेण्याचा प्रयत्न केला.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र तत्कालीन राज्यकर्त्यांकडून दडपण्याचा प्रयत्न
वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा इतिहास लिहिण्यात आला. या इतिहासात ‘आपल्याला तलवार आणि ढाल यांच्याखेरीज (बिना खडग् बिना ढाल) स्वातंत्र्य मिळाले’, असे सांगण्याचा सतत प्रयत्न झाला. वास्तविक वर्ष १९४६ आणि १९५० या काळात ब्रिटिशांपासून ३० देशांना स्वातंत्र्य मिळाले होते. त्यात भारताचाही अंतर्भाव आहे. सावरकर यांच्यावरील चित्रपटात काम करण्याविषयी मला विचारण्यात आले, तेव्हा काही लोकांनी मी या चित्रपटात काम करू नये; म्हणून मला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. ‘नेहरूंवर चित्रपट निर्माण केला, तर ती कला आणि सावरकरांवर चित्रपट निर्मिती केली, तर ती कला नाही का ?’, असा प्रश्न मला पडला. त्यामुळे मी एक कडू औषध लोकांना द्यायचे ठरवले आणि त्यात कोणत्याही प्रकारे राजकीय कमतरता राहू द्यायची नव्हती. ‘सावरकर यांच्या चरित्राशी कोणतीही चुकीची गोष्ट होऊ नये, ५-१० वर्षांनंतरही हा चित्रपट जुना झाला, असे लोकांना वाटू नये’, अशा या सर्व गोष्टींचा विचार करून मी या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला विरोध होणार आणि अडचणी येणार, याची मला कल्पना होती. त्याप्रमाणे चित्रपटाची निर्मिती करतांना मला अनेक अडचणी आल्या. आज आपल्या हिंदुस्थानातील विचारसरणीत हिंदुत्वाचे अतिशय महत्त्व आहे. सावरकर यांना दाबण्याचा प्रचंड प्रयत्न झाला, तरी आजही ते लोकांच्या मनात जिवंत आहेत.
३. सावरकर यांच्या चरित्रातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आणि अनुभव
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन आदर्श होते. त्यांचे बोलणे आणि वागणे यांत भेद नव्हता. १०० गोष्टींपैकी ९९ गोष्टी सावरकर अतिशय चांगल्या प्रकारे करत असत. त्यांचे बोलणे लोकांच्या मनावर थेट ठसत असे. देशासाठी बलीदान देणे, बाँब निर्माण करणे, बंदुकीतून गोळ्या मारणे हे केल्यानंतर ज्या वेळी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा होते, तेव्हा लक्षात येते की, क्रांती काय आहे ! त्यानंतर त्यांचा दृष्टीकोन पालटतो. सावरकर वास्तववादी आणि व्यवहारचतुर बनतात. साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर करण्यास ते प्रारंभ करतात. तिसर्या भागात ते एक राजकारणी दाखवले आहेत. ते एक आदर्श क्रांतीकारी म्हणून अधिक महान होते. राजकारणात त्यांना यश मिळाले नाही; कारण त्यांना अस्पष्ट किंवा गोल गोल फिरवून बोलता येत नव्हते. सावरकर यांनी स्वत: बरीच पुस्तके लिहीली; मात्र त्यांच्याविषयी अतिशय अल्प पुस्तके लिहिली गेली आहेत. सावरकर यांच्या पुस्तकांतूनच मी या कथेचा अभ्यास केला. एक माणूस म्हणून आपण स्वत:ला त्यांच्या ठिकाणी ठेवले, तरच त्यातील खरेपणा सर्वांना जाणवेल. मग आपण सावरकर असा किंवा नसा.
४. सावरकरांवरील कलाकृती निर्माण करण्यासाठी हुडा यांच्याकडून कठोर मेहनत
‘वर्ष १९१० ते १९६० या ५० वर्षांची आपल्याला शिक्षा झाली, तर आपली काय अवस्था होईल ?’, ही कल्पना करणेही आपल्यासाठी कठीण आहे. एक माणूस म्हणून मी सर्वसामान्य दृष्टीकोन ठेवून ही भूमिका केली आहे. त्यांची छायाचित्रे आणि चित्रफिती फारच अल्प आहेत. याउलट गांधीजींच्या कार्याच्या प्रारंभीपासूनच चित्रफिती दिसून येतात. सावरकर यांचे व्यंगचित्र बनावे, असे मला वाटत नव्हते. माझा मेकअप करणार्या समवेत बसून मी केवळ माझाच नाही, तर सर्व कलाकारांना जिवंत करण्याचा प्रयत्न केला. कलाकारांची निवड करतांना त्यांचा तोंडवळा त्या व्यक्तीरेखांशी मिळताजुळता असावा, तसेच चित्रपटाची गुणवत्ता अल्प होणार नाही, यासाठी पुष्कळ प्रयत्न केले आहेत.
५. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये विविध अडचणी
माझ्यावर ‘हा पैसा मिळवण्यासाठी चित्रपट करत आहे’, अशी टीका झाली. दर्जेदार चित्रपट निर्माण करायचा असेल, तर पैशाचे अंदाजपत्रक बिघडू शकते. या चित्रपटासाठी एका छायाचित्रकाराची निवड केली होती. तो पहिले ३ दिवस कुठेतरी निघून गेला. त्यानंतर दुसरा छायाचित्रकार शोधला. त्याच्या समवेत दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता चित्रीकरणास प्रारंभ केला. ५ दिवसांनी माझ्या लक्षात आले की, त्यांना चित्रीकरण करण्याचा काहीच अनुभव आणि ज्ञान नाही. त्यानंतर ते काम बंद केले आणि नवीन लोकांचा चमू सिद्ध करून परत कामाला प्रारंभ केला. काही काळानंतर काळ्या पाण्याच्या शिक्षेविषयी चित्रीकरण करण्यास पैसे अल्प पडले. मी आग्रह केला, तर अहंकारामुळे चित्रपटाचे चित्रीकरण बंद पडले. तेव्हा मी काय करणार ? माझ्याकडे दिग्दर्शक आणि लेखक यांच्यासमवेतचा काही करार नव्हता. माझ्याकडे एक घोडा आहे. एक दिवस मन रमवण्यासाठी मी घोड्यावरून रपेट करतांना चक्कर येऊन पडलो. माझ्या गुडघ्याला जोरात दुखापत झाली. त्यामुळे मी ८ आठवडे रुग्णालयात होतो. ‘माझ्या चमूतील कुणाचा भाऊ, तर कुणाची बहीण आजारी असल्याने त्यांना पैशाची आवश्यकता आहे’, असे निरोप यायला लागले. मी त्यांना दूरभाष करून सांगितले, ‘हा काही सर्वसाधारण चित्रपट किंवा प्रेमकहाणी नाही.’ त्यानंतर मी या चित्रपटासाठी स्वत:चे पैसे वापरायचे ठरवले. यावर न्यायालयात खटलाही प्रविष्ट (दाखल) झाला होता. त्यानंतर चित्रपट परिनिरीक्षण मंडळानेही अनेक अडचणी निर्माण केल्या. ‘या चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षक टाळ्या वाजवतात, तेव्हा सावरकरच ‘फारच छान, फारच छान’, असे म्हणत माझी पाठ थोपटत आहेत’, असे मला वाटते.
६. जनतेपासून सावरकरांविषयी सत्य लपवल्याने लोकांच्या मनात रोष
ज्या वेळी आपण एखाद्या सत्याकडे नवीन दृष्टीकोनातून बघतो, त्या वेळी फार त्रास होतो. ‘आजपर्यंत हे सत्य आपल्यापासून का लपवले गेले ?’, याचेही चित्रपट बघणार्यांना दु:ख होते. ‘हे तर आम्ही प्रथमच पहात आहोत’, असे वाटून ते बोलत होते. सर्वसाधारणपणे ‘हे आमच्यापासून का लपवले गेले ?’, याविषयी लोकांच्या मनात एक प्रकारचा राग दिसून आला.
७. काँग्रेसकडून स्वातंत्र्याचे श्रेय मिळवण्याचे कुटील प्रयत्न
‘जिंकणाराच इतिहास लिहितो’, हे वाक्य महत्त्वाचे आहे. त्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होती. त्यांचे मोठे नेते होते. पहिला इतिहास मजुमदार यांनी लिहिला होता. त्यात त्यांनी अनेक सत्य गोष्टी लिहिल्या. त्यामुळे त्यांना काँग्रेसने कारागृहात टाकले. त्यानंतर काँग्रेस पुरस्कृत लोकांनी इतिहास लिहिला. ‘काँग्रेस, नेहरू, गांधी आणि अजून काही लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले अन् ते मिळवण्यामध्ये इतर कुणाचाही त्यात सहभाग नाही’, असे सांगितले गेले. यामागे दोन कारणे असावीत, असे मला वाटते.
अ. एक म्हणजे सावरकर अतिशय प्रभावशाली व्यक्ती होते. आज ते असते, तर त्यांचे ‘यू-ट्यूब’वर बरेच ‘मीम्स’ बनले असते.
आ. दुसरे म्हणजे ‘भारत छोडो’ या आंदोलनाविषयी पुष्कळ राजकारण झाले. दुसर्या महायुद्धात ‘आम्ही साथ देणार नाही’, असे म्हटले गेले; पण त्या वेळी आपले सैन्य दोन्ही बाजूंनी लढत होते. काँग्रेसचे नेते पुण्यातील आगाखान पॅलेस आणि मोठमोठ्या महालांमध्ये बंद झाले होते. त्यांच्या राजकारणामुळे ‘काँग्रेस आपल्यासाठी लढत आहे’, असे जनतेला वाटू लागले.
स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम लिग, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि हिंदु महासभा हे ३ प्रमुख पक्ष होते. सध्या मुस्लिम लिग सर्व मुसलमानांचे प्रतिनिधित्व करत नाही. काँग्रेस सर्व हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाही. त्याचप्रमाणे हिंदू महासभा हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिपत्याखाली देशाची फाळणी झाली. त्या वेळच्या पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून लक्षावधी लोक जेव्हा भारतात परतत होते, तेव्हा प्रचंड हत्या झाल्या. त्या वेळी लोकांना वाटायला लागले की, ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची चूक आहे.