भेट नव्हे ही, होती ओळख स्वस्वरूपाची ।
कर्म म्हणाले मला ।
मी फळाला आलो आहे ।। १ ।।
भेटायला येऊ का तुम्हाला ।
अधिक फळे फुलायला ।। २ ।।
मी म्हणालो कर्माला ।
ये बाबा, आनंदाने भेटायला ।। ३ ।।
अज्ञानी बिचारे कर्म ।
जाणत नव्हते ते मला ।। ४ ।।
ते अपत्य प्रकृतीचे ।
मला भेटणे शक्य नाही त्याला ।। ५ ।।
त्याची भेट शक्य ।
त्याच्या प्रकृती माऊलीशी ।। ६ ।।
निष्काम होऊनी कर्म, सोडून फलासक्ती ।
त्यागून कर्तेपणा, होऊन आला अकर्ता ।। ७ ।।
जाणूनी परमतत्त्वासी, होऊन परमतत्त्व ।
झाली भेट त्याची अन् माझी ।। ८ ।।
भेट नव्हे ही, होती ओळख स्वस्वरूपाची ।
करून कर्म असे कर्ता एकच ।। ९ ।।
तो सर्वाठायी जगती, असून कर्ता सर्वाठायी ।
एकच अकर्ता असे तो जगती ।। १० ।।
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (७.११.२०२३)