वरुथिनी एकादशीला दर्शन घेणार्या वारकर्यांना दर्शन रांगेत कडक उन्हातून दर्शन घेण्याची वेळ !
पंढरपूर – पंढरपूर येथे सध्या प्रचंड उन्हाळा असून तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके आहे. असे असतांना पांडुरंगच्या दर्शनासाठी येणार्या वारकर्यांची परवड मात्र थांबलेली नाही. ४ मे या दिवशी झालेल्या वरुथिनी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग होती. या रांगेतून जातांना सारडा भवन, तसेच इतर अनेक ठिकाणी उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कशाचीच सोय नव्हती. त्यामुळे वारकर्यांना कडक उन्हात थांबून दर्शन घ्यावे लागले. ‘स्वत: कार्यालयात ए.सी.मध्ये बसलेल्या प्रशासकीय अधिकार्यांना वारकर्यांच्या वेदना कधी कळणार ?’ असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
१. श्री एकवीरादेवी मंदिर परिसरात जे भाविक दर्शन रांगेत उभे रहातात, तेथील रस्त्यावर टाकलेल्या स्लॅबची खडी वर आलेली आहे. ही खडी भाविकांच्या पायाला टोचते. त्यामुळे त्यावर ‘मॅट’ टाकण्याची मागणी ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’ने केली होती. याची अद्याप पूर्तता झालेली नाही. अन्य ठिकाणी असलेल्या ‘मॅट’ या परिसरात टाकाव्यात, अशी सूचना देऊनही त्या न टाकल्याने वारकर्यांच्या पायाला ही खडी टोचत आहेत.
२. येणार्या भाविकांना किमान २४ घंटे शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षक कृती समितीचे अध्यक्ष श्री. गणेश लंके यांनी जिल्हाधिकार्यांकडे वारंवार केली. या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी मंदिर समितीच्या संबंधित अधिकार्यांना सूचनाही दिल्या; मात्र त्या संदर्भात कोणतीही कृती न झाल्याने भाविकांचे हाल होत आहेत.