भारताने नेहमीच स्थलांतरितांना साहाय्य केले आहे ! – परराष्ट्रमंत्री एस् जयशंकर
भारत स्थलांतरितांविषयी अप्रसन्नता व्यक्त करणारा देश असल्याचा अमेरिकेचा आरोप भारताने फेटाळला !
(‘झेनोफोबिक’ म्हणजे स्थलांतरितांविषयीची अप्रसन्नता)
नवी देहली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे भारताला ‘झेनोफोबिक’ ठरवणे आणि भारताला आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या देशांच्या श्रेणीत टाकणे, यांवर केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एस् जयशंकर यांनी टीका केली आहे. जयशंकर म्हणाले, ‘‘भारत हा विशेष देश आहे. तो पाहुण्यांचे आपुलकीने आदरातिथ्य करण्यासाठी ओळखला जातो. जगाच्या इतिहासात भारत हा असा देश आहे, ज्याने नेहमीच गरजूंना साहाय्य केले आहे. त्यामुळे विविध पंथांचे लोक भारतात येतात.’’ बायडेन यांनी ‘भारत हा ‘झेनोफोबिक’ म्हणजेच स्थलांतरितांविषयी अप्रसन्नता दर्शवणारा देश आहेे. त्यामुळेच तो आर्थिकदृष्ट्या विकसित होऊ शकत नाहीत’, असे बिनबुडाचे आरोप केले होते.