Candy Crush Addiction : ‘मोबाईल गेम’चे व्यसन लागलेल्या पाद्य्राने चर्चच्या क्रेडिट कार्डद्वारे केले लाखो रुपये खर्च !
वॉशिंग्टन (अमेरिका) – ही घटना अमेरिकेत असलेल्या फिलाडेल्फियाच्या सेंट थॉमस मोर चर्चमध्ये घडली असून येथील एका पाद्य्राला ‘मोबाईल गेम’ खेळण्याचे व्यसन होते. यामुळे त्याने चर्चच्या क्रेडिट कार्डचा अपवापर करून ४० सहस्र अमेरिकी डॉलर (३३ लाख रुपयांहून अधिक रुपये) खर्च केले. अत्यधिक खर्च केल्याचा संशय आल्यावर चर्चच्या व्यवस्थापनाने रेव्हरंड लॉरेन्स कोझाक या दोषी सिद्ध झालेल्या पाद्य्राला पदावरून काढून टाकले. २५ एप्रिल या दिवशी कोझाकवर अधिकृतपणे चोरी आणि इतर संबंधित गुन्ह्यांचा आरोप करण्यात आला.
‘फिलाडेल्फिया इन्क्वायरर’ या आस्थापनाच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, कोझाक याने ‘कँडी क्रश’ आणि ‘मारियो कार्ट टूर’ यांसारख्या भ्रमणभाषमधील खेळांसाठी चर्चचे पैसे खर्च केले. तपासाच्या वेळी असे आढळून आले की, चर्चसाठी काम करणार्या एका लेखापालला चर्चशी जोडलेल्या ‘क्रेडिट कार्ड’वर मोठ्या प्रमाणात ‘ऍपल व्यवहार’ आढळले. हा खर्च सप्टेंबर २०१९ मध्ये चालू झाला आणि जुलै २०२२ मध्ये कोझाक पकडला जाईपर्यंत चालूच होता. क्रेडिट कार्डच्या कर्जाचा एक भाग फेडण्यासाठी कोझाकने स्वतःकडील १० सहस्र डॉलर वापरले.