Afghan Diplomat Arrested: सोन्याच्या तस्करी प्रकरणी अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकार्‍याला मुंबईत पकडले !

झाकिया वर्दाक

मुंबई – भारत दौर्‍यावर असलेल्या अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकारी झाकिया वर्दाक २५ किलो सोन्याची तस्करी करतांना २५ एप्रिल या दिवशी मुंबई विमानतळावर पकडण्यात आले. या सोन्याची किंमत १८ कोटी ६० लाख रुपये आहे. वर्दाक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सोने जप्त करण्यात आले आहे.‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त दिले आहे.

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्या सरकारच्या काळात झाकिया वर्दाक यांची मुंबईचे कौन्सुल जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

प्रथम अधिकार्‍यांनी वर्दाक यांना बॅगेत सोने असण्याविषयी प्रश्‍न विचारला असता त्यांनी अधिकार्‍यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर महिला पोलीस अधिकार्‍यांनी वर्दाक यांची झडती घेण्यासाठी त्यांना दुसर्‍या खोलीत नेले. येथे वर्दाक यांचे जॅकेट, लेगिंग्ज, ‘नी कॅप’ आणि बेल्ट यांमध्ये सोने सापडले. त्यात प्रत्येकी १ किलो वजनाच्या २४ कॅरेट सोन्याच्या २५ बारचा समावेश होता. काही महिन्यांपूर्वी भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास बंद करण्यात आला आहे.