Boycott Loksabha Elections 2024 : असनिये (सिंधुदुर्ग) गावातही राजकीय प्रचाराला बंदी !
रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी युवकांनी घेतला निर्णय !
सावंतवाडी : तालुक्यातील असनिये या दुर्गम भागातील गावात असलेल्या असुविधा, रस्त्यांची झालेली दुर्दशा या समस्यांविषयी आंदोलने करूनही केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीही करण्यात आले नाही, असा आरोप करत गावातील संतप्त युवकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी ‘गावातील सर्व पायाभूत सुविधा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही राजकीय लोकांनी मते मागण्यासाठी गावात येऊ नये’, असा फलक गावात लावला आहे.
‘असनिये-घारपी मुख्य रस्ता गेली २ वर्षे पूर्णत: उखडला आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी संमत झाला आहे; मात्र काम चालू करण्यात आले नाही. सध्याची रस्त्याची अवस्था पहाता एस्.टी. महामंडळाने बसगाड्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यास गावातील विद्यार्थी, ग्रामस्थ यांची असुविधा होणार आहे. यासह अल्प दाबाचा वीजपुरवठा, पाणी, कृषीसिंचन, वैद्यकीय सुविधा या सर्वांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे आम्ही युवक सर्व राजकीय पक्षांना नम्रतापूर्वक विनंती करतो की, सर्व पायाभूत सुविधा पूर्ण होईपर्यंत कृपया राजकीय लोकांनी मते मागण्यासाठी गावात येऊ नये.’
संपादकीय भूमिकाजनतेला असा निर्णय घ्यावा लागणे, हे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! |