Goa False Ceiling Issue : सार्वजनिक बांधकाम खात्याने कला अकादमीच्या कंत्राटदाराला ठरवले निर्दाेष !
कला अकादमीच्या ‘फॉल्स सिलिंग’चा एक भाग कोसळल्याचे प्रकरण
(फॉल्स सिलिंग म्हणजे प्लायवूड किंवा तत्सम वस्तूंपासून बनवलेले छत)
पणजी, ३ मे (वार्ता.) : २० एप्रिल या दिवशी राज्यात पणजीसह विविध ठिकाणी अवेळी पाऊस कोसळला होता. या वेळी पणजी येथील कला अकादमीच्या ‘फॉल्स सिलिंग’चा एक भाग कोसळला होता. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याने घटनेचे अन्वेषण करून एक अहवाल सिद्ध करून तो अहवाल सरकारला सुपुर्द केला आहे. या अहवालात कला अकादमीचे दुरुस्ती काम करणार्याच्या कंत्राटदाराच्या कामात कोणत्याही त्रुटी नसल्याचे म्हटले आहे.
या अहवालात ‘फॉल्स सिलिंग’ कोसळलेल्या ठिकाणच्या ‘स्लॅब’वर झाडांची पाने पडल्याने ‘स्लॅब’चे छीद्र बुजल्याचे आणि यामुळे ‘स्लॅब’वर पाणी साचल्याचे म्हटले आहे. साचलेल्या पाण्याची गळती झाल्याने ‘फॉल्स सिलिंग’ कोसळल्याचे म्हटले आहे. ‘फॉल्स सिलिंग’चा एक भाग कोसळल्यानंतर कला अकादमीचे दुरुस्ती काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित घटनेचे सार्वजनिक बांधकाम खात्याने अन्वेषण करून त्याचा अहवाल सरकारला सुपुर्द करण्यास सांगितले. या वेळी कला आणि संस्कृती मंत्री अन् कला अकादमीचे दायित्व सांभाळणारे गोविंद गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांची भेट घेऊन कला अकादमीच्या कामात काही त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या सूचीत टाकण्याची सूचना केली होती. सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याने अन्वेषणातून संबंधित कंत्राटदाराला निर्दाेष ठरवल्याने (‘क्लिन चीट’ दिल्याने) त्याला काळ्या सूचीत टाकण्याची शक्यता मावळली आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते कला अकादमीचे उर्वरित काम पूर्ण करणार
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार कला अकादमीचे बहुतांश दुरुस्ती काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे.