भोर (पुणे) येथील १० गावांना ७ टँकरने पाणीपुरवठा चालू !
महुडे (जिल्हा पुणे) – भोर तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. यामुळे टँकरच्या प्रस्तावात पंचायत समितीकडे वाढ होऊ लागली आहे. सध्या तालुक्यात १० गावे, तसेच त्यांतील वाड्या-वस्त्यांना ७ टँकरने पाणीपुरवठा चालू आहे, तसेच ३ गावांचे टँकरचे प्रस्ताव संमत झाले आहेत. ३ गावांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले असल्याचे भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले.
वर्ष २०२३ मध्ये पर्हर, उंबर्डे, शिळिंब, वारखंड, शिरगाव या ५ गावांना २ टँकरने पाणीपुरवठा केला होता. तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे यापुढील काळात टँकरची संख्या अजूनही वाढणार असल्याने यंदा पाणीटंचाईच्या संकटाला प्रशासनाला तोंड द्यावे लागणार आहे. पाणीटंचाईचे प्रमाण वाढले असून टँकरसाठी ज्या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आले आहेत. त्यांना तातडीने संमती देण्यात आली आहे. नवीन येणारे टँकरचे प्रस्तावही तातडीने संमतीसाठी तहसील विभागाकडे पाठवले जात असल्याचे भोरचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले.