सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्या आणि कर्तव्याचे निष्ठेने पालन करून निस्सीम कर्मयोग साधणार्या श्रीमती कालिंदी गावकर यांनी गाठली ६५ टक्के आध्यात्मिक पातळी !
सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्या आणि कर्तव्याचे निष्ठेने पालन करून निस्सीम कर्मयोग साधणार्या ओपा, खांडेपार, गोवा येथील श्रीमती कालिंदी गावकर (वय ८५ वर्षे) यांनी गाठली ६५ टक्के आध्यात्मिक पातळी !
फोंडा (गोवा) – सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणे, परेच्छेने वागणे, सहनशीलता, कठीण प्रसंगांचा सकारात्मकतेने सामना करणे, असे अनेक गुण असलेल्या ओपा, खांडेपार, गोवा येथील श्रीमती कालिंदी गावकर (वय ८५ वर्षे) यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता एका अनौपचारिक भेटीत घोषित करण्यात आली. ३० एप्रिल २०२४ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी श्रीमती गावकर यांच्या कुटुंबियांची अनौपचारिक भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली. या वेळी श्रीमती कालिंदी गावकर यांच्या मुली सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) आणि सौ. श्रुती नितीन सहकारी, जावई श्री. नितीन सहकारी, सून सौ. मेघना दीपक गावकर, सौ. ज्योती ढवळीकर यांच्या जाऊबाई सौ. लता दीपक ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांच्यासह सनातनचे काही साधक उपस्थित होते.
आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर श्रीमती कालिंदी गावकर यांनी व्यक्त केलेले मनोगत
श्रीमती गावकर यांचे कुटुंबीय त्यांच्याविषयी गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना त्या म्हणाल्या, ‘‘सर्वजण सांगत असलेले माझे हे गुण ऐकून मलाच लाज वाटते. माझेच किती गुणगान करतात. जे मिळाले ते देवाकडून मिळाले, माझे काहीच नाही. ‘स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कुणाची ।’’ असे म्हणून श्रीमती गावकर यांनी या सर्वाचे कर्तेपण भगवंताच्या चरणी समर्पित केले.
कुटुंबियांनी श्रीमती कालिंदी गावकर यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
१. सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (मुलगी)
आई म्हणजे अनेक गुणांची खाण आहे. तिनेच आम्हाला घडवले. वयोमानानुसार तिच्या शरिरातील शक्ती आता अल्प झाली असली, तरी मनाचा उत्साह पुष्कळ आहे. त्यामुळे आता वयाच्या ८५ व्या वर्षीही ती अखंड कार्यरत असते.
२. सौ. श्रुती नितीन सहकारी (मुलगी)
आईचा त्याग पुष्कळ आहे. ती स्वत:साठी काहीच न करता इतरांचा विचार करते. मनाचा कोणताही संघर्ष न करता ती नेहमी परेच्छेनेच वागते. गेल्या ५-६ महिन्यांत आईमध्ये पालट जाणवत आहे. तिच्या सहवासात असतांना माझ्या मनातील नकारात्मकता दूर होते. मन सकारात्मक होते. शांती आणि स्थिरता अनुभवता येते.
३. सौ. मेघना दीपक गावकर (सून)
श्रीमती गावकर माझ्या सासू नसून आईप्रमाणेच वाटतात. सासू-सासरे, दोन्ही नणंदा सात्त्विक आहेत. माझे मागच्या जन्मीचे पुण्य म्हणून हे कुटुंब मिळाले. या चांगल्या कुटुंबाला पाहून मला म्हणावेसे वाटते की, ‘जसे वटपौर्णिमेला ‘हाच पती सात जन्मांत मिळावा,’ असे म्हणतात, तसे जन्मोजन्मी मला याच सासू आणि हेच कुटुंब मिळावे.’
४. सौ. लता दीपक ढवळीकर
श्रीमती कालिंदी गावकर या माझी मावशी असल्याने मी लहानपणापासून त्यांना अनुभवले आहे. त्या नेहमी शांत, स्थिर असतात. सर्वांशी आपुलकीने बोलतात. त्यांचे सुनेशी वागणेही मैत्रिणीप्रमाणेच असते. प्रत्येक सासू-सुनेचे नाते असेच असावे, त्यामुळे सर्वच जण आनंद अनुभतील, असे वाटते.
श्रीमती गावकर यांच्या कुटुंबियांशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या झालेल्या या अनौपचारिक भेटीत कुटुंबियांनी श्रीमती गावकर यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये सांगितली. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी श्रीमती गावकर यांच्या आध्यात्मिक प्रगतीची आनंददायी घोषणा केली. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.
श्रीमती कालिंदी गावकर या ‘सनातन प्रभात’च्या वाचिका आहेत. त्यांच्यात उपजतच अनेक गुण आहेत. त्या गृहिणी असून त्यांची आध्यात्मिक प्रगती चांगल्याप्रकारे होत आहे, असे त्यांच्या मुलींना वाटत होते. त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या या वार्तेने कुटुंबियांसह साधकांनाही पुष्कळ आनंद झाला.