परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असलेल्या लुधियाना, पंजाब येथील साधिका सौ. माधवी शर्मा !
१. गुरुदेवांना आत्मनिवेदन करणे
‘मी साधना चालू केल्यानंतर कुलदेवता आणि दत्तगुरु यांचा नामजप करत होते अन् कालीमातेला सतत प्रार्थना करत होते. मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) आत्मनिवेदन करत होते, ‘साधना कशी करायची ?’, हे आपणच मला शिकवा आणि माझा हात पकडून मला पुढे घेऊन चला.’ नंतर माझी साधना वाढत गेली.
२. गुरुदेवांच्या कृपेने साधना गतीने होऊ लागणे
कोरोनाच्या कालावधीत मला वाटले, ‘गुरुदेवांनी माझा हात धरला आहे.’ त्यांच्या कृपेने माझी साधना गतीने होऊ लागली. लोकांसाठी तो आपत्काळ होता. सर्व जण एका अनामिक भीतीखाली जीवन जगत होते; मात्र तो काळ माझ्यासाठी, म्हणजे आम्हा सर्व साधकांसाठी संपत्काळ होता. मला कसलेच भय वाटत नव्हते. तेव्हा माझे मन मायेच्या विचारांपासून दूर जाऊ लागले आणि नामजपामुळे मला आनंद मिळू लागला.
३. नामजप करतांना पंचतत्त्वांशी संबंधित अनुभूती येणे
मी नामजप करत असतांना मला पंचतत्त्वांशी संबंधित अनुभूती आल्या, उदा. हिवाळ्याच्या कालावधीत उष्णता जाणवणे, स्वप्नात मोरासह आकाशात उडणे, वेगवेगळे सुगंध येणे, ‘शरिरावर पाण्याचे तुषार पडत आहेत’, असे जाणवणे, नामजप ऐकतांना वेगवेगळे नाद ऐकू येणे.
४. स्वयंसूचना सत्रे करणे आणि सत्संगात सहभागी होणे
माझ्यातील गुरुदेवांप्रतीच्या भावात वृद्धी होत होती. मी त्यांच्या कृपेने सहसाधकांच्या माध्यमातून त्यांचे रूप अनुभवत होते. मी व्यष्टी साधनेचा आढावा देऊ लागले आणि सत्संगात सहभागी होऊ लागले. गुरुदेवांच्या कृपेने मी स्वतःतील वेगवेगळ्या स्वभावदोषांवर स्वयंसूचना दिल्या. त्यामुळे माझ्यातील काही स्वभावदोष न्यून झाले.
५. आध्यात्मिक त्रास होत असतांना सहसाधकाने नामजप सांगणे
मला आध्यात्मिक त्रास होत असतांना त्रासाच्या निवारणासाठी मी सूक्ष्मातून गुरुदेवांना दोन वेगवेगळी माध्यमे शोधून सांगत होते; परंतु मला त्यांनी सूक्ष्मातील सांगितलेले उत्तर स्वीकारता येत नव्हते आणि ते मला आनंद देणारे नसायचे. माझा गुरुदेवांच्या प्रती भाव दृढ झाल्यावर तेच सहसाधकाच्या माध्यमातून मला नामजप सुचवत होते. त्यानंतर त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या उत्तराने मला आनंद मिळत असे आणि माझ्याकडून ते त्वरित स्वीकारले जात असे.
६. ‘गुरुदेव सतत समवेत आहेत’, अशी जाणीव होणे
अ. ‘गुरुदेव सतत माझ्या समवेत आहेत. त्यांच्याविना मी काहीच नाही. त्यांच्याकडून लाभलेली साधना, हेच माझे बळ आहे. तेच माझे श्वास आहेत. त्यांच्याविना मी जिवंत राहू शकत नाही’, असे मला जाणवू लागले.
आ. मला वाटते, ‘तिन्ही गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) माझ्या हृदयमंदिरात स्थानापन्न झाले आहेत.’ मी डोळे मिटताच ते माझ्यासमोर उपस्थित रहातात. ही अनुभूती ते मला प्रत्येक क्षणी देत आहेत. आता प्रत्येक क्षणी माझे मन गुरुदेवांशीच बोलत असते. काही चांगले झाल्यावर माझी त्वरित गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होते. मला त्रास होत असतांना ‘मला त्यातून काय शिकायचे आहे ?’, हे ते मला शिकवत असतात आणि त्या त्रासातही ते मला आनंदच देतात. काही वेळा मी प्रारब्ध भोगतांना त्रस्त होते. तेव्हा मी गुरुदेवांना आत्मनिवेदन करते, ‘माझे हे प्रारब्धाचे भोग कसे भोगायचे ?’, हे तुम्हीच सांगू शकता. यापूर्वीही आपल्याच कृपेने मी प्रारब्धभोग भोगले आणि आताही हे प्रारब्ध आपणच माझ्याकडून भोगून घेऊन नष्ट करावे.’
७. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ घरी येणे
७ अ. ‘गुरुदेवच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या रूपाने घरी येत आहेत’, असे जाणवणे : एकदा देहली सेवाकेंद्रातील साधकांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ लुधियाना येथे येणार आहेत.’’ तेव्हा माझी गुरुदेवांप्रती अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त झाली. त्या वेळी मला वाटले, ‘गुरुदेवांनी माझे आत्मनिवेदन ऐकले. मला माझे प्रारब्ध भोगण्यात साहाय्य करण्यासाठी ते श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या रूपाने येत आहेत.’ ‘आश्रमरूपी घराला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा चरणस्पर्श झाला आणि संपूर्ण पंजाबच्या भूमीचा उद्धार झाला आहे’, अशी मला अनुभूती आली.
७ आ. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कृपेने त्रास सूक्ष्मातून नष्ट झाले’, असे जाणवणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (गुरुमाता) यांच्या चरणांशी बसून मी त्यांना शरण जाऊन ‘माझे आणि माझ्या सासूबाई यांच्यामधील जे प्रारब्ध आहे, ते भोगणे अन् स्वीकारणे मला कठीण होत आहे’, त्याविषयी सांगितले. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे मला प्रारब्ध भोगणे पुष्कळ सुसह्य झाले. त्यांनी माझे पुष्कळसे त्रास सूक्ष्मातून नष्ट केले. त्यांनी मला ‘कसे प्रयत्न करायचे ?’, त्याविषयी सांगितले. मला आता प्रारब्ध भोगतांना वेगळाच आनंद मिळू लागला आहे.
८. गुरुदेवांच्या कृपेने प्रत्येक प्रसंगात शिकण्याच्या स्थितीत असणे
गुरुदेवांच्या कृपेने मी प्रत्येक प्रसंगात शिकण्याच्या स्थितीत असते. ‘आता प्रत्येक क्षणी गुरुदेवच सर्वकाही करत आहेत’, असे मला अनुभवता येते आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते. मी गुरुदेवांना सूक्ष्मातून कोणतीही अडचण सांगू शकते. मी त्यांना त्रासाविषयी सांगितल्यावर माझा त्रास दूर होऊन मला आनंद मिळतो.
९. सर्वांमध्ये गुरुरूप पहाता येण्यासाठी प्रार्थना करणे
मी सर्वांमध्ये गुरुतत्त्व पाहू शकत नसतांना गुरुदेवांनी मला प्रार्थना सुचवली, ‘हे गुरुदेवा, मला प्रत्येक प्राणी आणि सजीव-निर्जीव वस्तूंमध्ये आपल्याच रूपाचे दर्शन होण्यासाठी तशी दृष्टी प्रदान करावी. महाभारताच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने बर्बरिकाला दृष्टी प्रदान केली होती. त्यामुळे त्याला महाभारताच्या युद्धात मरणार्या आणि त्यांना मारणार्या सर्व योद्ध्यांमध्ये श्रीकृष्णाचेच दर्शन होत होते. तशीच दृष्टी आपण मला प्रदान करावी, म्हणजे मी सर्वांमध्ये आपले गुरुरूप पाहू शकीन.’
माझ्या मनात ही प्रार्थना सतत चालू असते. ज्यामुळे प्रत्येक प्राणी ताे त्रासदायक असो किंवा सात्त्विक असो त्याच्यामध्ये आपलेच दर्शन होते. मला कुणी चांगले-वाईट म्हणतात किंवा माझा स्वभावदोष उफाळून येतो, तेव्हा मला ते त्वरित स्वीकारता येऊ लागले.
१०. ‘गुरुदेवांच्या सत्संगाचे सुवर्णक्षण आपत्काळ हसत हसत झेलण्यासाठी पुरेसे आहेत’, असे वाटणे
एकदा माझ्या मनात गुरुदेवांच्या स्थूल रूपाचे दर्शन घेण्याची तीव्र तळमळ जागृत झाली. त्यांच्या कृपेने आम्हाला वैकुंठधामी बोलावून घेण्यात आले आणि तेथे मला त्यांचे दर्शन झाले. त्यांच्या केवळ दर्शनानेच माझी जन्मोजन्मीची भावरूपी तहान भागली. पंचमहाभूते गुरुदेवांच्या, म्हणजे श्रीविष्णूच्या अधीन आहेत. पंचमहाभूते गुरुदेवांमध्येच सामावलेली आहेत आणि त्यांच्यावर केवळ गुरुदेवांचेच नियंत्रण आहे. हे सर्व त्यांचे सूक्ष्मातून दर्शन आणि त्यांच्या व्यापकतेचे प्रतीक आहे. ‘गुरुदेव प्रत्येक साधकाच्या समवेत आहेत’, त्याची ही स्थुलातील अनुभूती होती. गुरुदेवांच्या सत्संगाचे जेवढे सुवर्णक्षण आम्हाला लाभले, ते क्षण आम्हाला आता आपत्काळ हसत हसत झेलण्यासाठी पुरेसे आहेत.
गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. माधवी शर्मा, लुधियाना, पंजाब. (२३.६.२०२२)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |