इस्रायल-हमास संघर्षाला पूर्णविराम लावण्यासाठी पॅलेस्टाईनच्या निर्मितीस आमचा पाठिंबा ! – भारत
इस्रायली ओलिसांच्या सुटकेचीही केली मागणी !
न्यूयॉर्क (अमेरिका) – इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाला पूर्णविराम लावण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या मागणीला पाठिंबा घोषित केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रूचिरा कंबोज म्हणाल्या की, पॅलेस्टाईन हे राष्ट्र म्हणून घोषित झाले, तर तेथील लोक त्यांच्या स्वत:च्या देशात सुरक्षितपणे जगू शकतील.
कंबोज यांनी हमासने इस्रायली ओलिसांच्या सुटकेचीही मागणी केली. त्या म्हणाल्या, ‘आतंकवादाला कधीही न्याय्य ठरवले जाऊ शकत नाही. भारताने नेहमीच आतंकवादाला विरोध केला आहे आणि यापुढेही करत राहील. इस्रायल आणि हमास या दोघांनी आंतरराष्ट्रीय कायदे अन् मानवतावादी कायद्यांचे पालन केले पाहिजे.’ या वेळी भारताने गाझामध्ये मानवतावादी साहाय्य वाढवण्यासाठीही देशांना आवाहन केले.
१८ एप्रिलला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पॅलेस्टाईनच्या स्थायी सदस्यत्वाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. हा प्रस्ताव अमेरिकेच्या नकाराधिकारामुळे (‘व्हेटो’मुळे) संयुक्त राष्ट्रांत अंतिम होऊ शकला नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने प्रस्ताव स्वीकारल्यानंतरच तो मतदानासाठी संयुक्त राष्ट्रांकडे पाठवला जातो.