Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे
गोव्यात एकूण ११ लक्ष ७९ सहस्र ६४४ मतदार
(‘पिंक’ मतदान केंद्र म्हणजे सर्व व्यवस्थापन महिला पहातात, असे मतदान केंद्र)
पणजी, २ मे (वार्ता.) : गोव्यातील मुख्य निवडणूक कार्यालयाने मतदारांची अंतिम सूची प्रसिद्ध केली आहे. यामध्ये उत्तर गोव्यात ५ लक्ष ८० सहस्र ७१०, तर दक्षिण गोव्यात ५ लक्ष ९८ सहस्र ९३४ मतदार मिळून एकूण ११ लक्ष ७९ सहस्र ६४४ मतदारांचा समावेश आहे. उत्तर गोव्यात १३३, तर दक्षिण गोव्यात १६७ मिळून एकूण ३०० ‘सर्व्हिस वोटर’ (विविध सेवांसाठी विविध कायद्यांन्वये पात्र असलेला मतदार) आहेत. राज्यात २८ सहस्र ४२ नवमतदार, ९ सहस्र ४२३ विकलांग, ८५ वर्षांहून अधिक वय असलेले ११ सहस्र ५०२ मतदार आणि विदेशात असलेले ८४ मतदार आहेत.
गोव्यात एकूण १३ सहस्र २४४ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये सर्व सुविधांनी युक्त असलेले उत्तर गोव्यात ४३ आणि दक्षिण गोव्यात ४५ असे मिळून एकूण ८८ आदर्श (मॉडेल) मतदान केंद्रे, उत्तर अन् दक्षिण गोव्यात प्रत्येकी ४० मिळून एकूण ८० पर्यावरणपूरक मतदान केंद्रे, उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी २० असे ४० ‘पिंक’, विकलांग व्यक्तींसाठी उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ३ अशी एकूण ८ मतदान केंद्रे आहेत.