नागपूर येथे विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला !

नागपूर – शिकवणीला जाण्यासाठी घरासमोर मित्राची वाट पहाणार्‍या एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न त्याच्या सतर्कतेने फसला. विद्यार्थ्याने घरच्यांना आवाज दिल्यामुळे अपहरणकर्ते पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे.

नंदनवन पोली ठाण्याच्या क्षेत्रात रहाणारा १७ वर्षीय तक्रारदार विद्यार्थी शिकवणीला जाण्यासाठी घरासमोर मित्राची वाट पहात उभा होता. त्याच वेळी एका चारचाकी वाहनातून ३ अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. त्यानंतर चालकाच्या बाजूला बसलेल्या एकाने विद्यार्थ्याला कारमध्ये बसण्यास सांगितले. विद्यार्थ्याने नकार देताच त्याने ‘गाडीत बस तुझ्याशी काही बोलायचे आहे’, असे सांगितले. त्यावर विद्यार्थ्याने नकार देत ‘मी तुम्हाला ओळखत नाही, मला नाही बसायचे’, असे स्पष्टपणे सांगितले.

गाडीतील व्यक्ती वारंवार गाडीत बसायला सांगत असल्याने संशय आल्यामुळे विद्यार्थ्याने गॅलरीत उभी असलेली बहीण आणि वडील यांना आवाज दिला. विद्यार्थ्याचे वडील खाली येत असल्याचे पाहून कारमधील तिघेही जण तेथून पळून गेले; मात्र तेवढ्यात विद्यार्थ्याने कारचे छायाचित्र भ्रमणभाषमध्ये काढून घेतले. या प्रकरणी विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करून अन्वेषण करत आरोपी प्रज्वल उद्धव सहारे (वय २३ वर्षे) आणि निरज बिहाने (वय २९ वर्षे) यांना अटक केली आहे.