श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी स्वप्नात केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कृती करून साधिकेने प्रसंगांवर केलेली मात !

‘एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी रात्री स्वप्नात येऊन मला उठवले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘तुझ्यात साधकत्व किती मुरले आहे ?’, हे मला पहायचे आहे. आता तू न झोपता मी सांगितलेले प्रयत्न करतेस का ? मी सांगितलेले तुझ्याकडून स्वीकारले जाते का ? किंवा तुला त्याविषयी काही अडचण असेल, तर तू ते मला मोकळेपणाने सांग.’ मी त्यांना सांगितले, ‘मी प्रयत्न करते. मला काही अडचण नाही.’ त्यानंतर स्वप्नातच पुढील प्रसंग घडले आणि मला त्यांतून योग्य प्रकारे बाहेर पडता आले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाक्याचे स्मरण होऊन ‘भावनाप्रधानता’ या स्वभावदोषावर मात करता येणे

त्यानंतर एका प्रसंगात मी भावनिक झाले. त्या क्षणी मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे वाक्य आठवले, ‘भावनाप्रधानता ही मानसिक स्तरावर असते. हे साधकत्वाचे लक्षण नाही. ‘तुझ्यात साधकत्व किती मुरले आहे ?’, ते बघ.’ या वाक्याच्या स्मरणाने मी त्या प्रसंगावर योग्य प्रकारे मात करून त्या प्रसंगातून बाहेर पडले.

२. स्वप्नात ‘परात्पर गुरु डॉक्टरांना स्थुलातून पाहूया’, असा विचार येताच ‘साधकत्वाच्या दृष्टीने काय करायला हवे ?’, याचे चिंतन होऊन चुकीच्या विचारावर मात करता येणे

सौ. स्‍वाती शिंदे

त्यानंतर दुसर्‍या प्रसंगात मला स्वप्नात गुरुदेवांची आठवण येऊन ‘त्यांना स्थुलातून पाहूया’, असे वाटत होते. तेव्हा ‘त्यांची प्राणशक्ती अल्प असते; म्हणून मी सूक्ष्मातूनच त्यांना अनुभवायला हवे’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी गुरुदेवांच्या सेवेतील एका साधकाने मला ‘मी गुरुदेवांना स्थुलातून कसे पाहू शकते ?’, याविषयी १ – २ पर्याय सुचवले. तेव्हा ‘माझ्यात साधकत्व मुरलेले असेल, तर मी कसा विचार करीन ?’, याचे चिंतन होऊन ‘मी त्या साधकाने सुचवल्याप्रमाणे करणे चुकीचे आहे आणि साधकत्वाच्या दृष्टीने मी त्यांना अनुभवायला हवे’, असे मला वाटले.

हे सर्व स्वप्नातच चालू होते. त्यानंतर ‘माझ्यात साधकत्व किती मुरले आहे ?’, असा विचार माझ्या मनात कधी आला नाही; पण श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी स्वप्नात येऊन मला ते शिकवले’, याबद्दल मला कृतज्ञता वाटली.’

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१९.३.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक