गृह मतदानाविषयी ए.आर्.ओ. आणि तहसीलदार यांनी भेट द्यावी ! – निवडणूक निर्णय अधिकारी एम्. देवेंदर सिंह
रत्नागिरी – गृह मतदान करतांना गोपनीयता राखली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच तहसीलदार यांनी भेट देऊन पहाणी करावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपर्क व्यवस्थापन, तथा जिल्हा निवडणूक व्यवस्थापन योजनेविषयी आढावा बैठक झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदीसह नोडल अधिकारी
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी मतदार चिट्टीचे वाटप, वेबकास्टींग, मतदार यादीवरील पीबी मार्कींग याविषयी विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘साहाय्यक निवडणूक अधिकारी, तहसीलदार यांनी मतदान केंद्रावंरील वेबकास्टींगविषयी भेट देऊन पहाणी करावी. त्याची रंगीत तालिम पहावी. झोनल अधिकारी, तलाठी यांची बैठक घेऊन नियोजन, तसेच व्यवस्था याविषयी आढावा घ्यावा. जिल्हा आरोग्य अधिकार्यांने दिलेले आरोग्य नियोजन सर्वांना पाठवण्यात येईल, त्यानुसार कार्यवाही करावी.’’
गृह मतदानाच्या सोयीबद्दल पद्मा आठल्ये यांनी दिले धन्यवाद !
इच्छा असूनही वयोमानामुळे, शारीरिक व्याधीमुळे मतदान केंद्रांपर्यंत जाता येत नाही. माझ्यासारखे असे अनेक जण आहेत. अशा ८५ वर्षांपुढील मतदारांसाठी गृह मतदानाची भारत निवडणूक आयोगाने सोय केल्याबद्दल आरोग्य मंदिर येथील पद्मा आठल्ये (वय ८७ वर्षे) यांनी धन्यवाद दिले.