हिंदु महिलांना झाले काय ?

आज आपण महिला सक्षमीकरणाच्या युगात आहोत. ज्या ज्या क्षेत्रात ‘ती’ केवळ महिला आहे; म्हणून त्यांना संधी मिळत नव्हती, अशी जवळजवळ सगळी क्षेत्रे महिलांसाठी आज उपलब्ध आहेत. सरकारी पातळीवरसुद्धा महिलावर्ग पुढे यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. संसदेत महिलांना मिळालेले ३३ टक्के आरक्षण विधेयक हा त्याचाच एक भाग आहे.

१. सामाजिक माध्यमांद्वारे स्त्रीत्वाचा बाजार !

शिक्षण, नोकरी, व्यवसाय, व्यक्तीमत्त्व विकास यांच्या इतक्या संधी उपलब्ध असतांना आज अनेक महिला स्वतःच्या स्त्रीत्वाचा बाजार सामाजिक माध्यमांतून मांडण्याच्या आणि त्यातून ‘लाईक्स’ (आवडले), ‘शेअर’ (अन्यांना प्रसारित करणे) करण्याच्या अन् पैसे मिळवण्याच्या मागे लागल्या आहेत. या महिला ‘इंटरनेट’च्या मायाजालात इतक्या वहावत गेल्या आहेत की, त्यांना आपण समाजाला काय दाखवत आहोत ? याचे भान राहिलेले नाही. कॅमेरासमोर कपडे काढणे, कपडे पालटणे, अश्लील बोलणे; ‘भाऊ-बहीण, दीर-वहिनी या नात्यांना कलंक फासला जाईल’, असे व्हिडिओ बनवणे, तान्ह्या बाळांना स्तनपान करतांनाची छायाचित्रे मुद्दाम दाखवणे; पादचारी, सहप्रवासी यांची टिंगल करणे, त्यांची फजिती करणे आणि ती सर्वांना दाखवणे; या नादात नवरा, सासू, सासरे यांना वाट्टेल ते बोलणे, प्रसंगी त्यांना मारहाण करणे, विवाहबाह्य संबंध आणि त्याचे उदात्तीकरण हे प्रकार आजकाल सर्रास चालू आहेत. महिलांच्या या ‘पोस्ट’वर कुणी त्यांना समजवण्यासाठी ‘कमेंट’ (प्रतिक्रिया) केली, तर महिलांच्या ओंगळवाण्या प्रदर्शनाचा आनंद घेणारे समाजातील काही महाभाग समजवणार्‍या व्यक्तीलाच ‘तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही बघू नका’, ‘तुमच्याच नजरेत पाप आहे’, असे सल्ले देतात. अशा लोकांमुळे या महिलांना ‘आपण काही चुकीचे करत आहोत’, असे वाटतच नाही आणि त्यांच्या निर्लज्जपणाला अजून चेव येतो.

२. स्पर्धा आणि प्रसिद्धी यांचा नातेसंबंधांवर गंभीर परिणाम

श्री. अनिकेत विलास शेटे

अशा महिलांचे व्यक्तीगत आयुष्य फार काळ सुरळीत रहात नाही. प्रसिद्धीचा नाद,  त्या प्रसिद्धीसाठी खर्च होणारा पैसा, लोकांच्या प्रत्येक प्रकारच्या टिपण्या आणि त्यावर उत्तरे, सतत ‘आपण कसे दिसत आहोत ? आपण कुणाला आवडत आहोत ?’, याचा विचार, स्वत:चे ‘फॉलोअर्स’ (अनुयायी) वाढवण्याची स्पर्धा या सगळ्याचा वैयक्तिक नातेसबंधांवर परिणाम होतो. अशा महिलांच्या वागण्यामुळे कंटाळलेल्या पुरुषांची घटस्फोटाची वाढती मागणी हा गंभीर विषय झाला आहे.

स्वत:चे आयुष्य आणि कौटुंबिक सुख नष्ट करण्यासह समाजाला बिघडवण्याच्या समष्टी पापात त्या सहभागी होत आहेत, याचे भान त्यांना राहिलेले नाही. आपण चित्रित करून जे दाखवत आहोत, ते सामाजिक माध्यमांवर दाखवले जात असतांना तिथे ठराविक वयाचा प्रेक्षक प्रतिबंधित करायची सोय नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे; कारण आजकाल लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांकडे भ्रमणभाष असल्यामुळे सरसकट कुणीही काहीही बघू शकते. मग महिलांच्या या असल्या उथळ ‘रिल्स’ बघून लहान आणि तरुण मुलामुलींच्या मनावर काय परिणाम होईल ? याचा विचार करायला हवा.

३. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे समाज दूषित करण्याचा अधिकार नाही !

आजकाल पालकांना नोकरीमुळे मुलांसाठी वेळ देणे शक्य नाही, तसेच घरातील वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे ‘भ्रमणभाषवर जे दिसेल, तेच खरे जग आहे’, असे मुलांना वाटणे सहज शक्य आहे. यातूनच बाल गुन्हेगारी, महिला अत्याचार, व्यसनाधीनता, खोट्या ऐश्वर्याचा दिखावा आणि त्यातून येणारी ईर्ष्या या गोष्टींना खतपाणी मिळते. पाश्चात्त्य देशातील स्त्रीवादाच्या चुकीच्या कल्पना भारतात पसरल्या आहेत. ‘आपण स्त्री आहोत, शिकलेल्या आहोत, आपल्यासाठी स्वतंत्र कायदे आहेत; आपण आपल्या पायावर उभ्या राहू शकतो, म्हणजे आपण कसेही वागलो, तरी चालेल; आपण कशालाच उत्तरदायी नाही’, हे गैरसमज आहेत. स्वतंत्र कायदे आणि आरक्षण हे आजपर्यंत दुर्लक्षित असलेला महत्त्वाचा घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा यांसाठी आहे. त्याचा गैरवापर करून समाज दूषित करण्याचा अधिकार कुणालाही नाही.

४. हिंदु स्त्रीला धर्मापासून लांब नेण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र

हिंदु धर्मात फार पूर्वीपासून स्त्री ही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. एखाद्या घराण्याचे यश हे त्या घरातील स्त्रियांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. हेच बाळकडू त्या घरातील पुढील पिढीला मिळत असते. कुटुंबातील स्त्री ही धर्माचरणी असेल, तर ते पूर्ण कुटुंब धर्माचरणी बनते; म्हणूनच हिंदु स्त्रीला धर्मापासून लांब नेण्याचा आणि भारतातील कुटुंब व्यवस्थेला सुरूंग लावण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र आखून जोरदार प्रयत्न चालू आहे. पाश्चात्त्य भोगवादी विकृतीची फळे काय आहेत ? हे परदेशातून मन:शांतीच्या शोधात भारतात येणार्‍या अहिंदूंना बघून लक्षात येते. त्यामुळे हिंदूंनी आयुष्यात प्रत्येक शिकवणीच्या स्वानुभवाचा आग्रह न धरता (त्यात वेळ आणि व्यक्तीगत आयुष्य पणाला न लावता) इतरांच्या अनुभवातून शिकायची सिद्धता ठेवावी. जगद्गुरु संत तुकोबारायांच्या ‘तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’, या अभंगाच्या ओळी हिंदूंनी कायम लक्षात ठेवाव्यात.

– श्री. अनिकेत विलास शेटे, चिंचवड, जिल्हा पुणे. (१०.०४.२०२४)