चेन्नई येथील श्री गुरुवायुरप्पन् यांच्या मंदिरात दर्शन घेत असतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती !
‘६.९.२०२३ या दिवशी गोकुळाष्टमी होती. त्या दिवशी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना करत होते. त्या वेळी ‘आज मला गुरुदेव कोणत्या रूपात दर्शन देणार आहेत ?’, या विचारात मी मग्न होते. त्या अवस्थेत मला त्यांची भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, श्री रंगनाथ, भगवान सत्यनारायण आणि श्रीमन्नारायण या रूपांतील दर्शने आठवली.
१. श्री गुरुवायुरप्पन् यांच्या मंदिरातील पूजा चालू असतांना भावजागृती होणे आणि प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे
त्यानंतर सकाळीच आम्ही जवळच असलेल्या सुंदरा विनयागार मंदिरात गेलो. त्या दिवशी माझा नातू कु. केशव याचा तिथीनुसार पहिला वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही भगवान गुरुवायुरप्पन् यांचा अभिषेक आणि पूजा (अर्चन) यांची व्यवस्था केली होती. अभिषेक आणि पूजा चालू असतांना माझी भावजागृती झाली. त्या वेळी मला प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.
२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे भगवान गुरुवायुरप्पन् यांच्याप्रमाणे भक्तवत्सल असल्याची आलेली प्रचीती !
कलियुगात भगवान श्रीकृष्णाने श्री गुरुवायुरप्पन् यांच्या रूपात आपले भक्त नारायण भट्टाद्री यांच्याशी संभाषण केले आहे. भट्टाद्री यांनी १ सहस्र ३४ श्लोकांमध्ये ‘नारायणीयम्’ नावाचे श्रीमद्भागवताचे संक्षिप्त रूपात लिखाण केले आहे. प्रत्येक दशक पूर्ण झाल्यावर ते भगवान गुरुवायुरप्पन् यांना विचारायचे, ‘भागवतात लिहिलेल्या सर्व गोष्टी खर्या आहेत का ? तुम्ही प्रत्यक्षात या सर्व गोष्टी केल्या आहेत का ?’ यावर भगवान केवळ ‘हो’ म्हणून थांबले नाहीत, तर त्यांनी भट्टाद्रींना दृश्य स्वरूपात या गोष्टी पुन्हा दाखवल्या. यातून भगवंताचे आपल्या भक्ताप्रती असलेले अपार वात्सल्यच दिसून येते.
याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवही आपल्याशी केवळ संभाषण करत नाहीत, तर ते आपल्या स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्वरूपांतील शंकांचे निरसनही करतात. ते आपल्या प्रारब्धाचा भार हलका करतात, तसेच आपल्याकडून असंख्य चुका झाल्या आणि आपल्यात अनेक स्वभावदोष असले, तरी आपल्याला जीवनमुक्त होण्यासाठी मार्गदर्शनही करतात.
‘हे प्रभो, भगवान श्री गुरुवायुरप्पन् यांच्या रूपात मला दर्शन दिल्याबद्दल तुझ्या चरणी अनंत कोटी नमस्कार !’
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन् (वय ५८ वर्षे), चेन्नई, तमिळनाडू. (६.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |