पुणे शहरात तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिक हैराण; हवामानशास्त्र विभागाकडून ‘यलो अलर्ट’ !
पुणे – शहरातील उष्णतेच्या पार्याने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, तसेच उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन हवामान विभाग आणि आधुनिक वैद्य यांनी केले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमान ४३.५ अंशावर जाऊन पोचले आहे. यंदा मार्चच्या अखेरपासून पार्याने ४० शी पार केली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
१. उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे. पोलीस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, उद्योग व्यवसायातील सुरक्षा अधिकारी, कामगार यांना उष्माघात प्रथमोपचार आणि सी.पी.आर्. प्रशिक्षण द्यावे.
२. बाजार, प्रमुख कार्यालये, बस स्टँड, टॅक्सी स्टँड, रिक्शा स्टँड अशा सार्वजनिक ठिकाणी पुरेशी सावली, पाण्याची व्यवस्था आणि उष्माघाताविषयी जनजागृती करणारे पोस्टर्स / कापडी फलक लावावेत. उद्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत खुली ठेवावीत.
३. आरोग्य केंद्रात स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था, आवश्यक औषधसाठा आणि जलद प्रतिसाद ‘टीम’ सिद्ध करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे, तसेच वन्य प्राणी आणि पक्षी यांसाठी पुरेसे वृक्षारोपण अन् पाण्याचा पुरवठा असावा, तसेच प्राण्यांची विशेष काळजी, औषधे, पुरेसे पाणी, हिरवा चारा, तसेच निवार्याची व्यवस्था करावी. उद्योग व्यवसायातील कामगारांना पुरेसा निवारा आणि पिण्याच्या थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.