मुंबईत मद्यालयाच्या येथेच मद्यपी ढोसतात मद्य, ‘येथे मद्य पिण्यास मनाई आहे’ आदेशाचा केवळ सोपस्कार !

प्रतिकात्मक चित्र

श्री. प्रीतम नाचणकर

मुंबई, १ मे (वार्ता.) – मद्यालयात मद्य विकत घेतल्यानंतर बाटली घरी नेईपर्यंतही संयम न बाळगता मुंबईतील अनेक मद्यालयांबाहेर मद्यपी मद्य ढोसतात. महाराष्ट्रात मद्यालयांच्या ठिकाणी मद्य पिणार्‍यांच्या अनेक तक्रारी आल्यावर उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीच राज्यातील सर्व मद्यालयांच्या दर्शनी भागात ‘येथे मद्य पिण्यास मनाई आहे’, ही सूचना लावणे बंधनकारक केले आहे. असे प्रकार आढळल्यास मद्यालयाच्या मालकांवर उत्पादन शुल्क विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते; परंतु असे असतांनाही मुंबईतील मद्यपी सरकारच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवून मद्यालयाच्या येथेच तर्र होत आहेत.

मद्यालयांना केवळ मद्य विक्री करण्याची अनुमती असते. मद्यालयांच्या ठिकाणी मद्य पिण्याची सोय करून द्यायची असेल, तर त्यासाठी स्वतंत्रपणे ‘परमिट रूम’ची अनुमती घेणे बंधनकारक आहे. ‘परमिट रूम’ची अनुमती न घेता मद्यालयांच्या येथे मद्यपिण्याचा प्रकार होत असेल, तर संबंधित मद्यालयाची अनुज्ञती काही कालावधी करता रहित करणे किंवा दंड आकारणे अशी शिक्षा केली जाते. मद्यालयांच्या येथे मद्य पिण्याचे प्रकार रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यालयांना वेळोवेळी त्याविषयी तंबी दिली जाते; पंरतु त्याकडे दुर्लक्ष करून मुंबईतील बहुतांश मद्यालयाच्या येथेच मद्यापी मद्य पितांना आढळतात.

दादर रेल्वेस्थानकातील सर्व परिसरात मद्यालयांपुढे मद्य पिण्याचे प्रकार !

दादर रेल्वेस्थानकाच्या पूर्व बाजूला रेल्वेस्थानकाला लागूनच मुख्य रस्त्यावर आणि आणखी पुढे ४-५ मद्यालये आहेत. या सर्व मद्यालयांमध्ये सायंकाळी ७ वाजल्यापासून मद्यपी मद्याच्या बाटल्या विकत घेऊन तेथे गर्दी करून मद्य ढोसतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या-येणार्‍यांना अडचण होते.

मद्य पिऊन रेल्वेस्थानकाच्या परिसरात मद्यपी पडतात !

अनेक मद्यपी पाण्याच्या बाटलीत मद्य ओतून त्यावर कागद किंवा कापड लावतात. काही मद्यपी तर रेल्वेमध्ये बसल्यावर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत ओतलेले मद्य पितात.

मद्यालयांच्या बाहेर किंवा आजूबाजूला मद्य प्राशन केल्यामुळे काही मद्यपी रेल्वेस्थानकांच्या फलाटावर, रेल्वेस्थानकाच्या जीन्यांवर, रेल्वे तिकीटघर, तर काही मद्यपी रेल्वेस्थानकाच्या बाहेरील रस्त्याच्या कडेला तर्र होऊन पडलेले असतात. दादर रेल्वेस्थानकाच्या परिसरात तर नेहमीच अशा प्रकारचे मद्यधुंद आढळतात. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणारे दंगा करतात.

शुद्धीत नसल्यामुळे नागरिक आणि पोलीसही मद्यपींकडे दुर्लक्ष करतात; परंतु हे प्रकार रोखण्यासाठी मद्यालयांच्या ठिकाणी मद्यप्राशन करणारे मद्यपी आणि संबंधित मद्यालयांचे मालक यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई कठोरपणे करणे आवश्यक आहे.