1st May – Maharashtra Din : प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळण्यासह देशाच्या विकासातही महाराष्ट्राचे योगदान ! – किशोर तावडे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गनगरी : १ मे १९६० या दिवशी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून हा ‘महाराष्ट्रदिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतांनाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक, तसेच सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी येथे केले.
महाराष्ट्रदिनानिमित्त १ मे या दिवशी सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस कवायत मैदानात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी तावडे यांच्या हस्ते झाला. या वेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तावडे या वेळी म्हणाले,
‘‘महाराष्ट्र ही संत, शूरवीर, समाजसुधारक, क्रांतीकारक यांची भूमी आहे. राज्याच्या विकासामध्ये समाजातील सर्वच घटकांचा सिहांचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सुपुत्रांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालते, हे सप्रमाण सिद्ध करणार्या माझ्या कामगार बांधवांना आजच्या कामगारदिनी मनापासून शुभेच्छा देतो. १ मे १९८१ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आला. त्याला आज ४३ वर्षे होत आहेत. यानिमित्ताने जिल्हावासियांनाही शुभेच्छा.’’