Goa Heat Wave : गोव्यात पुढील ८ दिवस तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने वाढणार ! – हवामान खाते
जनतेने आरोग्याची काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन
पणजी, १ मे (वार्ता.) : गोवा राज्यात पुढील ८ दिवस तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने वाढणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. राज्यात सध्या सरासरी तापमान ३३.५ ते ३४.५ अंश सेल्सिअस असते आणि आता ते वाढून ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा अधिक त्रास सहन करावा लागणार आहे.
एप्रिल महिना चालू झाल्यापासून राज्यात तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. हवामान खात्याने १ मे या दिवशी दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिल या दिवशी पणजी येथे कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान सामान्य किमान तापमानापेक्षा १.२ अंश सेल्सिअस वाढून ते २७.५ अंश सेल्सिअस झाले होते. हवामान खात्याने पुढील २ दिवस वातावरण उष्ण आणि दमट, तसेच ढगाळ रहाण्याची शक्यता वर्तवली आहे, तसेच १ ते ७ मे या कालावधीत राज्यातील वातावरण कोरडे रहाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे लोकांना चक्कर येणे, उलटी, मळमळ यांसारखे आजार जडले आहेत. यामुळे ‘लोकांनी भरपूर पाणी प्यावे आणि भर उन्हात बाहेर जाऊ नये’, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.