कलाकारांनो, कला ईश्वरप्राप्तीसाठी असल्याने कला शास्त्रशुद्ध, सात्त्विक पद्धतीने आणि भावपूर्णपणे सादर करून ईश्वराचे आशीर्वाद मिळवा !’
‘गायन, वादन आणि नृत्य यांचे विविध कार्यक्रम (‘शो’) विविध वाहिन्यांवरून प्रसारीत होतात. लोकांमध्ये सध्या अशा कार्यक्रमांची पुष्कळ आवड (क्रेझ) निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीवरील नृत्याचा एक ‘रिॲलिटी शो’ माझ्या पहाण्यात आला. त्यात विविध नृत्यप्रकार प्रस्तुत केले होते. या ‘रिॲलिटी शो’मधील नृत्ये, त्यांचे आयोजक, स्पर्धक, परीक्षक आणि दर्शक यांच्याविषयी माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया येथे देत आहे.
भाग १
१. एका वाहिनीवर ‘रिॲलिटी शो’मध्ये सादर केलेले विचित्र नृत्यप्रकार !
या कार्यक्रमामध्ये प्रस्तुत केलेल्या नृत्यप्रकारांतील काही प्रकार येथे दिले आहेत.
१ अ. भूतनृत्य -‘भुताने स्वतःला मारलेल्या व्यक्तीचा सूड घेणे’ या कथेवर सादर केलेले नृत्य ! : या नृत्य प्रकारात एक भूत दाखवले होते आणि ‘ते भूत स्वतःला मारलेल्या व्यक्तीचा सूड घेते’, अशी त्या नृत्याची कथा होती. यात भुताचा नाच करणार्या स्पर्धकाने अगदी भुतासारखेच चपखल प्रसाधन (‘मेकअप’) केले होते. ‘ते भूत स्वतःला मारलेल्या व्यक्तीला त्रास देते, तिचा गळा दाबते आणि शेवटी तिला मारून टाकते’, असे नृत्याद्वारे दाखवले होते.
१ आ. प्रणयनृत्य : दुसरा एक प्रकार होता प्रणयनृत्य. यात एक महिला अन् एक पुरुष कलाकार होते. दोघांनीही ते नवरा-बायको असल्याप्रमाणे प्रणयनृत्य प्रस्तुत केले. मला ते पहातांनाही लाज वाटली.
१ इ. भरतनाट्यम् : तिसर्या प्रकारात २ स्पर्धकांनी भरतनाट्यम् नृत्य प्रस्तुत केले. त्यांनी भरतनाट्यम् अल्प आणि स्टंट (धाडसीपणा) अधिक सादर केला.
२. ही नृत्ये पहातांना मनाची झालेली विचारप्रक्रिया
२ अ. भुताचे नृत्य
१. अध्यात्मातील एका सिद्धांतानुसार ‘शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध’ हे नेहमी एकत्र असतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्या व्यक्तीचे रूप आठवते. त्यानुसार ‘भूत’ शब्द उच्चारल्यावर तिथे निश्चित भुताचे अस्तित्व जाणवणार !
२. हे नृत्य पाहून कार्यक्रमामध्ये भाग घेणार्या स्पर्धकांना ‘देवापेक्षा भूते जवळची वाटतात का ?’, असा प्रश्न माझ्या मनात आला.
३. देवी-देवतांच्या एवढ्या कथा असतांना त्या सोडून ‘भुताची कथा निवडणे’, ही विकृती आहे’, असे मला वाटले.
२ आ. प्रणयनृत्य
१. हे नृत्य पाहून मला पुष्कळ चीड आली. ‘यांनी नृत्याचा नुसता बाजार केला असून नृत्याला अतिशय खालच्या स्तराला नेले आहे’, असे मला वाटले. चित्रपटात अशा दृश्यांचा अतिरेक असतोच; परंतु ‘अशी दृश्ये असलेले नृत्य सगळ्यांसमोर केले जात आहे’, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
२. स्पर्धेत भाग घेण्यार्यांना नैतिकतेचे भानच नाही. ‘स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी नैतिकता सोडणे’, कितपत योग्य आहे ?, ‘स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जायचे का ?’, असे प्रश्न स्पर्धकांना विचारावे’, असे मला वाटले.
२ इ. भरतनाट्यम् नृत्य
१. हे नृत्य करणारे स्पर्धक ‘भरतनाट्यम् ऐवजी स्टंटच (धाडसीपणा) अधिक करत होते. त्यामुळे या नृत्याला ‘स्टंट’ नृत्य (धाडसीपणा) हेच नाव योग्य ठरेल’, असे मला वाटले.
२. या नृत्यात स्टंटपणासह (धाडसीपणा) अंगविक्षेपही बरेच होते.
हे सर्व प्रकार पाहून मला नृत्याच्या नावाखाली चाललेल्या विकृतीचेच दर्शन झाले. ‘ही नृत्ये, म्हणजे नृत्यदेवतेचा अपमानच आहे’, असे मला वाटले. त्यातील प्रणयनृत्य तर ‘लाजेने मान खाली जाईल’, असे होते. तो कार्यक्रम पाहून माझे मन सुन्न झाले.’
(क्रमशः)
– सौ. अनघा शशांक जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, बी.ए.(संगीत)), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा (२२.४.२०२४)
भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/791889.html