सुप्रसिद्ध भरतनाट्यम् नर्तक गुरु विद्वान पार्श्वनाथ उपाध्ये, गुरु (सौ.) श्रृति गोपाल आणि गुरु आदित्य पी.व्ही. यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी घेतली सदिच्छा भेट !
फोंडा (गोवा) – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य अभ्यासिका सौ. सावित्री इचलकरंजीकर आणि नृत्याशी संबंधित संशोधन सेवा करणार्या साधिकांनी २१ एप्रिल या दिवशी बेंगळुरू येथील सुप्रसिद्ध भरतनाट्यम् नर्तक गुरु विद्वान श्री. पार्श्वनाथ उपाध्ये, गुरु (सौ.) श्रृति गोपाल आणि गुरु श्री. आदित्य पी.व्ही. यांची भेट घेतली. हे तिघे एका कार्यक्रमानिमित्त राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे आले असता तेथे त्यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत तिन्ही नृत्य गुरूंना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय वैज्ञानिक उपकरणांद्वारे संगीताविषयी (गायन, वादन आणि नृत्य यांविषयी) करत असलेल्या संशोधन कार्याची माहिती ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’ या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून दाखवण्यात आली. या तिघांनीही अतिशय जिज्ञासेने संगीत संशोधनाचे कार्य समजून घेतले, तसेच ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला अवश्य भेट देऊ’, असेही सांगितले. या भेटीच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. मनोज सहस्रबुद्धे, सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी आणि कु. अपाला औंधकर हे उपस्थित होते.
गुरु विद्वान पार्श्वनाथ उपाध्ये यांचे नृत्यकलेसंबंधी काही मौलिक विचार आणि अनुभव
१. माझ्यासाठी ‘नृत्य आणि अध्यात्म’ हे वेगळे नसून एकच आहे. जेव्हा मी ‘शिव तांडव’ नृत्य सादर करतो, तेव्हा माझा असा प्रयत्न असतो की, मला भक्त बनायचे आहे. त्यामुळे नृत्यातील व्यक्तीरेखा सादर करतांना मला एकरूपता अनुभवता येते. भरतनाट्यम् नृत्यामध्ये एक नर्तक अनेक पात्रे सादर करतो. त्यामुळे नर्तक त्या पात्राशी एकरूप झाला नाही, तर त्याला ते पात्र उत्तमरित्या सादर करता येऊ शकत नाही.
२. प्रेक्षागृह (ऑडिटोरिअम), व्यासपीठ (स्टेज) आणि आपण प्रतिदिन जिथे नृत्याचा सराव करतो, या तिन्ही ठिकाणी नृत्य करतांना विविध अनुभव येतात. कोणत्याही प्रेक्षागृहामध्ये नृत्य करण्यापेक्षा जिथे आपण प्रतिदिन सराव करतो, त्या जागी मला अधिक सकारात्मकता जाणवते आणि तिथे सराव उत्तम होतो. ‘ही नृत्यातील शक्ती आहे’, असे मला वाटते. माझ्यासाठी ‘मी जेव्हा एकटा सराव करतो, तेव्हा ‘माझी ती साधना आहे’, असे मला जाणवते आणि त्याची छटा रंगमंचावर दिसून येते.
३. इटलीमध्ये एका हिंदु आश्रमात आम्ही तिघेही (गुरु विद्वान पार्श्वनाथ उपाध्ये, गुरु (सौ.) श्रृति गोपाल आणि गुरु श्री. आदित्य पी.व्ही.) जातो, रहातो आणि नृत्य शिकवतो. मी तिथेही एक नृत्य प्रस्तुती केली होती; परंतु तो आश्रम असल्याने तेथे सादरीकरणाचा अनुभव पुष्कळ वेगळा होता. तेथील वातावरणात आम्हाला पुष्कळ सकारात्मकता जाणवली; परंतु हेच दुसर्या दिवशी अन्य ठिकाणी सादर करतांना विशेष अनुभूती आली नाही. यातून आम्हाला आश्रमातील सात्त्विकतेची प्रचीती आली.
४. मी माझ्या इष्टदेवतेचा नामजप केल्याविना रंगमंचावर नृत्य सादर करत नाही. त्यामुळे मला रंगमंचावर देवतांच्या अस्तित्वाची अनुभूती घेता येते !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आभारगुरु विद्वान श्री. पार्श्वनाथ उपाध्ये, गुरु (सौ.) श्रृति गोपाल आणि गुरु श्री. आदित्य पी.व्ही. यांनी त्यांच्या व्यस्तेतून अमूल्य वेळ देऊन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संगीत संशोधनाचे कार्य जाणून घेतले, तसेच त्यांचे अनुभव आणि विचार व्यक्त केले, यासाठी विश्वविद्यालयाच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत. यासमवेत ‘कलानिलयम् स्कूल ऑफ आर्ट्स’च्या संचालिका आणि गुरु विद्वान पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या शिष्या सौ. प्रार्थना कौशिक-जांभळे यांच्या सहकार्यामुळे आम्हाला त्यांची भेट घेता आली, यासाठीही आम्ही त्यांचे आभारी आहोत. – सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२२.४.२०२४) |