होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना त्यांचे वडील पू. सत्यनारायण तिवारी यांची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. जाणवलेली सूत्रे

पू. सत्यनारायण तिवारी

१ अ. वडिलांना संत घोषित केल्यावर कृतज्ञता व्यक्त होऊन ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सगुण सेवा करायला मिळावी’, ही इच्छा पूर्ण होणे : ‘२३.५.२०२३ या दिवशी माझ्या वडिलांना (श्री. सत्यनारायण तिवारी यांना) संत घोषित करण्यात आले. त्यापूर्वी मी त्यांची सेवा करतांना ‘संतांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करत होते; परंतु तो अल्प आणि अनियमित होता. बाबांना ‘संत’ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर आरंभीचे ३ दिवस मी सतत भावावस्थेत असल्याने मी त्यांची सेवा ‘ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सगुण रूपच आहे’, या भावाने करून प्रार्थना केली. मला ‘कधीतरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सगुण सेवा आपल्याला मिळावी आणि त्यांच्या सहवासात सेवा करता यावी’, अशी पुष्कळ इच्छा होती. पू. बाबा संत झाल्यावर माझा तोच भाव राहून कृतज्ञता व्यक्त झाली आणि भावस्थिती टिकून राहिली.

१ आ. पू. बाबांची सेवा परिपूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

१. ‘पू. सत्यनारायण तिवारी हे माझे बाबा आहेत’, असा संस्कार मनावर दृढ असल्याने मधूनमधून तो संस्कार जागृत व्हायचा. त्यामुळे पू. बाबांची सेवा करतांना मला प्रार्थना आणि नामजप यांसह करण्यास किंवा ‘ते संत आहेत’, या भावाने करण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. ते संत घोषित झाल्यानंतर अनुमाने ३ आठवड्यांनी त्यांची सेवा भावपूर्ण करण्याचे माझे प्रयत्न वाढले.

२. संत सेवेचा अनुभव असलेल्या किंवा साधना चांगली असणार्‍यांना मी ‘ते संत आहेत’, असा भाव माझ्या मनात निर्माण होण्याविषयी विचारले असता त्यांनी सुचवले, ‘तू त्यांना सहज बोलतांनाही ‘पू. बाबा’ असेच म्हणत जा.’ त्यानंतर हळूहळू मला ते जमू लागले. पू. बाबांच्या सेवेत असतांना अन् त्यांच्या सहवासात असतांना नामजप करतांना मला आनंद मिळू लागला.

३. मी आणि आई ‘पू. बाबांच्या चैतन्याचा लाभ व्हावा’, यासाठी दिवसभरातून मधेमधे थांबून प्रार्थना करू लागलो आणि त्यांच्या वस्तू हाताळतांना प्रयत्नपूर्वक प्रार्थना अन् नामजप करत हाताळू लागलो.

१ इ. पू. बाबांच्या सहवासात त्यांची, म्हणजे संतांची सेवा असल्याने झालेले त्रास

१. पू. बाबांच्या सहवासात असतांना पहिले ३ आठवडे ‘संघर्ष होणे, काही वेळा मन अस्वस्थ होणे आणि काही प्रमाणात शारीरिक त्रास होणे’, असे त्रास होत होते.

२. पू. बाबांच्या सहवासात हळूहळू माझा त्रास उणावत असला आणि नामजप होत असला, तरी सकाळी लवकर उठता येत नसे.

२. पू. बाबांच्या सहवासात असतांना आलेल्या अनुभूती

२ अ. भ्रमणभाष पहाण्याचे प्रमाण उणावणे : आधी मी दिवसभरात १ घंटा भ्रमणभाषवर वेळ वाया घालवत असे. यासाठी मी सारणीत चुका लिहायचे, प्रायश्चित्तही घ्यायचे आणि स्वतःला निरनिराळ्या प्रकारची शिक्षाही करत असे, तरीही मला भ्रमणभाष पहायचा मोह व्हायचा. पू. बाबांच्या सहवासामुळे आज ५ आठवड्यांनंतर हे प्रमाण उणावून १० मिनिटांवर आले आहे. तेव्हा ‘अनावश्यक भ्रमणभाष हाताळणे, हे आध्यात्मिक त्रासाचे लक्षण असून ही अयोग्य सवय चैतन्यानेच जाऊ शकते’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली.

२ आ. कंबरदुखीचा त्रास उणावणे : मला मागील ८ – १० वर्षांपासून कंबरदुखीचा त्रास आहे. तो अधूनमधून होत असतो. ‘पू. बाबांच्या सेवेत माझा कंबरदुखीचा त्रास उणावला’, असे मला जाणवत आहे.

२ इ. नामजप करतांना आनंद मिळणे : ३ आठवड्यानंतर मला पू. बाबांच्या सहवासात प्रसन्न वाटून माझा नामजप अधिक वेळ होऊ लागला. पू. बाबा संत झाल्यानंतर १ मासाने ‘मला २ दिवस सलग पुष्कळ नामजप करावा’, असे वाटून आनंद होऊ लागला. त्याच वेळी आईलाही अशीच अनुभूती आली. आई आणि मी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत नामजप करत बसलो. तेव्हा पू. बाबांच्या चैतन्यामुळे मला नामजप करण्यासाठी प्रयत्न करावे लागले नाहीत.

३. पू. बाबांची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

३ अ. प्रार्थना आणि नामजप करत सेवा केल्यावर पू. बाबांनी साधिकेकडे शांतपणे पहाणे, अन्य वेळी साधिकेवर ओरडणे : माझी एकाग्रता नसली किंवा माझ्या मनात अन्य विचार चालू असले की, पू. बाबा मला ओरडायचे. माझ्या मनात प्रार्थना आणि सेवा यांचे विचार असतील किंवा मी नामजप करत असेन, तेव्हा पू. बाबा माझ्याकडे अधूनमधून शांतपणे पहायचे. त्या वेळी ‘संतांच्या सहवासात आपले सतत परीक्षण होत असते’, असे मला वाटले.

३ आ. लघुशंका झाल्यावर कपडे आणि पलंगपोस पालटणे अशा सेवा सहजतेने केल्यावर पू. बाबांनी कौतुक करणे अन् त्यानंतर सेवा उत्साहाने केली जाणे : एकदा पू. बाबांना थोड्या थोड्या वेळाने ६ वेळा लघुशंका झाल्याने मला ६ वेळा त्यांचे कपडे पालटणे, पलंगपोस पालटणे, असे करावे लागले. त्या वेळी मला त्याविषयी काहीच वाटले नाही. तेव्हा माझ्या मनात काहीच विचार नव्हते आणि ती सेवा सहजतेने झाली. तेव्हा पू. बाबा मला उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘शाब्बास !’’ तेव्हा ‘प.पू. डॉक्टरांनीच मला शाबासकी दिली’, असे मला वाटले. तेव्हा भावजागृती होऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. पू. बाबांनी रात्री कपडे ओले केले, तरी मला जाग येते आणि ती सेवा करण्याचा आळस येत नाही.

३ इ. संतांना त्यांच्या सेवेपेक्षा सेवा करणार्‍या साधिकेची साधना होणे अपेक्षित असणे : पू. बाबांना जेवण भरवतांना मला त्यांच्या तोंडातील घास संपल्याचा अंदाज आला नाही किंवा मी थोडा मोठा घास भरवला असता पू. बाबा मला ओरडले. तेव्हा मला जाणीव झाली की, माझी एकाग्रता नव्हती आणि माझ्याकडून लक्षपूर्वक कृती झाली नाही. त्यानंतर ‘त्यांना जेवण भरवणे’ या सेवेचा आरंभ मी जयघोष करून आणि नंतर घास भरवतांना प्रयत्नपूर्वक नामजप करू लागले. तेव्हापासून या सेवेसंदर्भात ते कधीच माझ्यावर ओरडले नाहीत.

३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर वडिलांनी छायाचित्र काढण्यास सांगणे : ८.६.२०२३ या दिवशी पू. बाबांचे छायाचित्र काढण्यासाठी २ साधक आले होते. ते येईपर्यंत पू. बाबा त्यांचे छायाचित्र काढणार म्हणून सिद्ध झाले होते. ते साधक आल्यावर पू. बाबा ‘पलंगावरून उठणार नाही’, असे म्हणू लागले. ते म्हणाले, ‘‘मी झोपूनच रहाणार, काढायचे तर असेच छायाचित्र काढा.’’ त्यानंतर पुन्हा सांगितल्यावर ते शिव्या देऊ लागले. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना केली आणि त्यांना हळूवारपणे सांगितले, ‘‘पू. बाबा २ मिनिटे लागतील. छायाचित्र काढू या का ?’’ काही क्षणांनी ते उठले आणि त्यांचे छायाचित्र अल्प कालावधीत काढले गेले.

३ उ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार नामजप करत सेवा केल्यावर वडिलांचे अवलियाप्रमाणे वागणे उणावणे : पू. बाबांचे अवलियापणे वागणे काही वेळा माझ्या आणि आईच्या लक्षात येत नसे. (ते अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न करत असत. कितीही सांगितले तरी ऐकत नसत. काही वेळा आम्हाला मारणे, शिव्या देणे, असे त्यांचे वागणे असे.) मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना पू. बाबांविषयी विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आपण नामजप करत सर्व करायचे.’’ त्यानंतर त्यांचे तसे वागण्याचे प्रमाण उणावले.

३ ऊ. संत सहवासात राग येण्याचे प्रमाण उणावून आनंद मिळणे : पू. बाबांच्या सहवासात असतांना काही कौटुंबिक प्रसंग घडले. त्यात काही वेळा मला ताणही आला होता. तसेच माझा अहंही उफाळून आला. एकदा एका प्रसंगात मी पू. बाबांसमोर आईला रागावून मोठ्याने बोलले. नंतर मला त्याची खंत वाटू लागली. ही चूक मी व्यष्टी आढाव्यात सांगितली. आईची क्षमाही मागितली आणि प्रायश्चित्त घेतले. अशी प्रक्रिया केल्यावर माझे मन शांत झाले. यासाठी मी पू. बाबांचीही क्षमायाचना केली. त्यानंतर आजपर्यंत मला राग आला नाही. प्रसंग घडले; परंतु मी आईशी शांतपणे बोलू शकले.

४. अन्य अनुभूती

४ अ. साधिकेला तिच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी ३ कमळे उमललेली दिसणे, देवीने सांगितल्याप्रमाणे त्यातील वरच्या कमळावर मन एकाग्र करून नामजप केल्यावर नामजप चांगला होऊन हलके वाटणे : ९.६.२०२३ या दिवशी पू. बाबांच्या जवळ बसून नामजप करत असतांना माझा नामजप सहजतेने आणि एकाग्रतेने होत होता. अर्धा घंटा नामजप झाल्यानंतर मला माझ्या आज्ञाचक्रावर सूक्ष्मातून लहान, त्यापेक्षा थोडी मोठी आणि मोठी अशी ३ कमळे थोड्या थोड्या अंतरावर दिसली. सर्वांत वरच्या कमळावर मला एक देवी दिसली. तिने मला सांगितले, ‘आरती, वरच्या कमळाच्या पाकळ्यांच्या मध्यभागी मन एकाग्र करून नामजप कर, म्हणजे तुझा नामजप अजून चांगला आणि परिणामकारक होईल.’ त्याप्रमाणे केल्यावर माझा नामजप चांगला होऊन मला हलके वाटू लागले. तेव्हा ‘नामजप करतच रहावा’, असे मला वाटत होते.

४ आ. मणीपूरचक्राच्या ठिकाणी श्री गुरूंचे चरण दिसून मन शांत होणे : माझ्या मणीपूरचक्राच्या ठिकाणी मला काही क्षण श्री गुरूंचे चरण दिसले आणि माझे मन शांत झाले. पू. बाबांच्या सहवासात नामजप करतांना मला अशा प्रकारची अनुभूती प्रथमच आली. एकूण २ घंटे नामजप कधी संपला, ते मला कळलेच नाही.

४ इ. साधकांचा नामजप चांगला होण्यासाठी देवता साहाय्य करतात, याविषयी देवीने सांगितल्यावर कृतज्ञता व्यक्त होणे : नामजप चांगला होण्यासाठी देवतांनी साहाय्य केल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करत असतांना माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी दिसलेली देवी मला पुन्हा दिसली. तिने सांगितले, ‘सनातनच्या आश्रमात सदैव देवतांचा वास असतो, तसेच संतांच्या आसपासही देवतांचा वास असतो. ‘साधकांचा नामजप चांगला होण्यासाठी त्यांना भावजागृतीसाठी साहाय्य करणे’, हा परात्पर गुरुदेवांच्या कार्यातील आमच्या सेवेचा एक भाग आहे.’ देवीचे वचन ऐकून माझ्याकडून परात्पर गुरुदेव आणि पू. बाबा यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. माझे डोळे आपोआप मिटले गेले आणि मला त्याच स्थितीत रहावेसे वाटले.

हे गुरुराया, ‘माझे स्वभावदोष आणि अहं उफाळले, तरी तुम्ही माझ्याजवळ अखंड असता’, याची मला सतत जाणीव राहू दे. मला अखंड आपल्या अनुसंधानात रहाता येऊ दे’, अशी शरणागतभावाने आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, फोंडा, गोवा. (११.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक