परकीचे पद चेपू नका…!

काल १ मे झाला. स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थान सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील अनेक बुद्धीवादी, लेखक, पत्रकार, शाहीर साबळे, प्र.के. अत्रे, कॉ. श्रीपाद डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह मराठी भाषिक जनतेने प्रखर आंदोलन केले. या आंदोलनातील १०५ व्यक्तींचे बलीदान फळास आले. १ मे १९६० या दिवशी अनेक राज्यांच्या विभाजनातून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले. ज्या मराठी भाषेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली, आज त्याच महाराष्ट्रात माय मराठीची स्थिती अत्यंत लाजिरवाणी आहे. महाराष्ट्रातील प्रशासनाच्या वतीने चालवल्या जाणार्‍या मराठी शाळांची फार बिकट स्थिती आहे. मराठी शाळांमध्ये शिकण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांचे पालक अजिबात उत्सुक नाहीत. सगळ्यांची धाव इंग्रजी भाषेतील शिक्षणाकडे आहे. मराठी भाषिक कुटुंबांमधून मुलांना शाळेत, तसेच व्यावहारिक जीवनात दिल्या जाणार्‍या इंग्रजी भाषेच्या अवास्तव प्राधान्यामुळे एक वाक्यही धडपणे शुद्ध मराठीत बोलता येत नाही. विद्यार्थ्यांना अस्खलितपणे मराठी पुस्तकातील एक परिच्छेदही वाचता येत नाही, ही मेकॉलेप्रणित इंग्रजी शिक्षणामुळे निर्माण झालेली शोकांतिका आहे. मराठी व्याकरण आणि मराठीत उपलब्ध असलेले एका शब्दासाठीचे अनेक पर्याय, मराठी भाषेचे सौंदर्य, हे तर तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना माहीतही नाहीत आणि ते जाणून घेण्याची आंतरिक इच्छा त्यांच्यामध्ये सध्याची शिक्षणप्रणाली निर्माण करू शकलेली नाही.

पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगिकार केल्याने आणि इंग्रजीशी मराठीची तुलना करत असल्यामुळे मराठी बोलणार्‍यास कमी लेखले जाते. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी याला ‘मनाची गुलामी’ असे नाव देतात. इंग्रजीमध्ये केलेली ‘बकवास’सुद्धा लोकांना विद्वत्तापूर्ण भाषण वाटते आणि मराठीमध्ये केलेले विद्वत्तापूर्ण विवेचनसुद्धा अनेकांना बकवास वाटते ! या मानसिक गुलामीचे मानेवरील जोखड झुगारून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. अभ्यासकांच्या मते मराठीचे वय सुमारे २४०० वर्षे आहे. मराठी भाषेचा वैभवसंपन्न इतिहास आणि तिची समृद्धी विषद करण्यास शब्द अपुरे पडावेत. मराठी ही जगातली पहिल्या १० क्रमांकामधली भाषा आहे. तिचा पूर्वेतिहास अभिमान वाटावा इतका रोचक, संपन्न आणि वैभवपूर्ण आहे. हे प्रथम आपल्या मन:पटलावर अंकीत करायला हवे ! त्यामुळे मराठी भाषेचे राजपुरुष कवि कुसुमाग्रज यांच्या शब्दांत सांगायचे तर –

‘परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी । माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ।। भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे ।  गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका ।।’

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.