विदेशातील नव्या-जुन्याचा संगम झालेली प्रगत आणि भारतातील सुधारण्यास पुष्कळ संधी असणारी ग्रंथालय व्यवस्था !

पुणे विद्यापिठाच्या अधिसभा सदस्य (सिनेटर) डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी विदेशातील आणि भारतातील ग्रंथालयांवरील त्यांच्या अनुभवाविषयी मांडलेल्या सूत्रांचा लेख येथे देत आहोत.

भारतात दीड सहस्र वर्षे परकियांनी आक्रमकांनी सातत्याने आक्रमणे करून प्राचीन भारतीय संस्कृती नष्ट केली. त्याच काळात म्हणजे १८, १९ आणि २० व्या शतकात युरोपांतील देशांत मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक शोध, औद्योगिकीकरण, कला साहित्य यांची निर्मिती आदी ज्ञानार्जनाच्या शाखा विकसित झाल्यामुळे तिथे साहजिकच मोठी विद्यापिठे अन् त्या अनुषंगाने मोठी ग्रंथालये यांची निर्मिती झाली आणि २० व्या शतकात ती संगणकीकृत झाल्याने अन् तेथील सेवा देण्याची पद्धती चांगली असल्याने त्यांचे उत्तमप्रकारे पुनरुज्जीवन झाले आहे. तुलनेत ‘भारत प्राचीन काळी अत्यंत प्रगत होता’, हे आता कुठे समाजाला समजत आहे. सध्या भारतातील ग्रंथालयांमध्ये अनेक त्रुटीही निदर्शनास येतात. भारतातील ग्रंथालयांमध्येही संगणकीकरण वाढून सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची संस्कृती विकसित होणे अपेक्षित आहे. त्यातूनच प्राचीन संस्कृतीचा ठेवा जतन करणारी आधुनिक डिजिटल ग्रंथालये निर्माण होतील !

एखाद्या राष्ट्राची भरभराट ही तेथील ‘शिक्षणाचा दर्जा कसा आहे ?’ यावर सर्वाधिक अवलंबून असते आणि कोणत्याही शिक्षण संस्थेचा दर्जा त्यातील ग्रंथालयांच्या दर्जावर ठरतो, असे समजले जाते. वैदिक कालापासून आपल्याकडे ‘श्रृती’ (वेद) आणि ‘स्मृती’ (वेदांवर भाष्य करणारे विविध ग्रंथांचे प्रकार) यांवरच भर असल्याने मौखिक परंपराच होती. ज्ञान हे लेखनापेक्षा ‘श्रृती’ आणि ‘स्मृती’ यांच्या माध्यमातूनच साठवून पाठांतर केले जात असे आणि पुढच्या पिढीला संक्रमित होत असे. (व्यासांनी श्री गणेशाकडून महाभारत लिहून घेतल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर व्यासांनी अनेक प्रकारची ग्रंथनिर्मिती केली. त्यांनी ‘स्पर्श न केलेला विषय जगात नाही’, असे म्हटले जाते.)

ऑक्सफर्ड विद्यापीठ

प्राचीन भारतातील नालंदा, तक्षशीला यांसारख्या विद्यापिठांत सहस्रो ग्रंथ असणे !

श्रृती आणि स्मृती यांमध्ये म्हणजे वेदांमध्ये सर्वच प्रकारचे ज्ञान उपलब्ध असल्यामुळे पुढील युगात त्यातूनच अनेक शास्त्रांची निर्मिती होऊन कलियुगाच्या आरंभी ‘ग्रंथलिखाण’ही होऊ लागले. अतीप्राचीन अशा हिंदु संस्कृतीत राजे आणि त्यांच्या अत्यंत प्रगत राजवटी होऊन गेल्या. वैदिक गणित, स्थापत्य, वास्तू, खगोल, ज्योतिष, आयुर्वेद, युद्ध, तंत्रज्ञान, नौकानयन, विमानशास्त्र आदी सर्वच विषयांची शास्त्रे या काळात विकसित झालेली होती. त्यांचे ग्रंथही उपलब्ध होते. हिंदु आणि बौद्ध धर्मातील ज्ञान अन् सहस्रो हस्तलिखित ग्रंथ हे या ग्रंथालयांच्या माध्यमातून साठवले गेले. तिथेच शिक्षक सहस्रो विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने त्या ग्रंथालयांचा अतिशय चांगला उपयोग, तसेच संवर्धन झाले. नालंदा आणि तक्षशीला यांसारख्या विद्यापिठांत प्रचंड मोठी ग्रंथालये उभी राहिली. त्यात एवढे प्रचंड ग्रंथ होते की, इस्लामी आक्रमकांनी हे ग्रंथालय जाळले, तेव्हा ६ मास हे ग्रंथ जळत होते. पूर्वी मंदिरांतही ग्रंथालये असत.

नालंदा विद्यापीठ

हिंदूंचे वेदांचे ज्ञान मौखिक असल्याने ते संक्रमित होत रहाणे

आपल्याकडील मौखिक परंपरांचा एक लाभ असा झाला की, हिंदु धर्म, वैदिक धर्म यांवर आक्रमण झाल्यावर त्यातील ज्ञान हे पूर्णपणे नष्ट झाले नाही; कारण ते अनेक व्यक्तींच्या डोक्यात होते. मौखिक परंपरेने ते संक्रमित होत राहून वाचले; पण बौद्ध धर्माच्या संदर्भात जेव्हा भारतीय उपखंडात परकीय आक्रमणे झाली, तेव्हा नालंदा, तक्षशीला ही विद्यापिठे जाळून नष्ट करण्यात आली. तिथल्या बौद्ध भिख्खूंना मारून टाकण्यात आले. परिणामी बौद्ध धर्माचे मूळ तत्त्वज्ञान भारतीय उपखंडातून नाहीसे झाले; पण हेच तत्त्वज्ञान त्याआधीच आशिया खंडातील अतीपूर्वेकडील देशांमध्ये पोचल्याने त्याचे तिकडे संवर्धन झाले.

अलीकडच्या काळात पाश्चात्य देशांत सार्वजनिक स्वरूपात ग्रंथालय ही संकल्पना विकसित होणे !

युरोपात सगळीकडे ज्ञानाचा साठा लेखनाच्या माध्यमातून ठेवण्याची पद्धत चालू झाल्यानंतर त्यांच्याकडे अनेक गोष्टींचे ‘डॉक्युमेंटेशन’ (ज्ञानाचे लिखाण किंवा ज्ञानविषयांचे संदर्भ लिहून ठेवणे) चालू झाले. इंग्लंड, तसेच युरोप येथे पुष्कळ जुनी अशी भव्य ग्रंथालये अनेक आहेत. इंग्लंडमध्ये असतांना केंब्रिज विद्यापिठातील ‘युनिव्हर्सिटी लायब्ररी’, ट्र्रिनिटी महाविद्यालयाची (न्यूटनच्या काळापासून असलेली) ‘व्रेन लायब्ररी’, ऑक्स्फर्ड विद्यापिठाची ‘बॉड्लीयन लायब्ररी’, लंडनची ‘ब्रिटीश लायब्ररी’ पहाण्याची संधी मिळाली. या विद्यापिठांच्या दर्जांप्रमाणेच त्यांच्या ग्रंथालयांचा दर्जाही खरच उत्तम आहे. जेव्हा मी पहिल्यांदा केंब्रिज विद्यापिठाची ७ मजली युनिव्हर्सिटी लायब्ररी (स्थापना वर्ष १४१८) बघितली, त्या वेळी असे वाटले की, हे जगातील सगळ्यांत मोठे ग्रंथालय आहे. त्या वेळी समजले की, केंब्रिजच्या युनिव्हर्सिटी लायब्ररीपेक्षा युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोची ‘रोबार्ट्स लायब्ररी’ चांगली आणि मोठी आहे. याची सत्यता रोबार्ट्स लायब्ररी पाहिली, त्या वेळी पटली.

डॉ. अपर्णा लळिंगकर

भारतीय भाषांची पुस्तके असणारे ऑक्सफर्ड विद्यापिठाचे मोठे ग्रंथालय !

युरोपातील अनेक जुन्या विद्यापिठांची ग्रंथालये भव्य-दिव्य आहेत. त्या इमारतींचे बांधकामच आपल्याला ३-४ शतके मागे घेऊन जाते. ऑक्सफर्डच्या ‘बॉड्लीयन लायब्ररी’त (स्थापना वर्ष १६०२) तर मुख्य भूमीच्या खाली २ मजले आहेत आणि वर ६ मजल्यांचे गोलाकार ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयाचा तो गोलाकार परिसरच पुष्कळ मोठा आहे. तिथे जवळ जवळ सर्वच विषयांवर अनेक दुर्मिळ पुस्तके, मासिके, नियतकालिके (जर्नल्स), हस्तलिखिते, तसेच अद्ययावत नवनवीन प्रकाशित होणारी पुस्तके, नियतकालिक (जर्नल्स), मासिके असे सगळे आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटी लायब्ररीच्या मुख्य मजल्याच्या भूमीखाली दोन मजले आहेत. त्या ग्रंथालयात मी स्वत: ग्रीक भाषेत लिहिलेली भूमितीची जुनी हस्तलिखिते बघितली आहेत. आपल्या भारतीय संस्कृत, मराठी, तमीळ, बंगाली, हिंदी, उर्दू, तेलुगु यांसारख्या भाषांमधील विविध पुस्तकांचे खणपण बघितले आहेत. मराठीतील ह.ना. आपटे, शं.ना. नवरे, ह.मो. मराठे, पु.ल. देशपांडे यांसारख्या आणि अजूनही बर्‍याच लेखकांची पुस्तके येथे पहाण्यात आली.

ट्रिनिटी कॉलेजच्या व्रेन ग्रंथालयात तर ‘ब्रिटानिका मॅथॅमॅटीक्स’च्या (ब्रिटन येथील गणित) मूळ हस्तलिखित प्रती बघायला मिळतात. वर नमूद केलेल्या ग्रंथालयांत अद्ययावत् पुस्तके आणि आता सर्व ‘डिजिटल लायब्ररीज्’ (संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित ग्रंथालय) सुद्धा उपल्ब्ध आहेत. कदाचित् ‘ऑक्स्ब्रीज’ (म्हणजे ऑक्स्फर्ड आणि केंब्रिज) यांसारख्या विद्यापिठांत एकूण पुस्तकांची संख्या (स्ट्रेंन्थ) तेथील एकूण संपूर्ण विद्यापिठांत असलेल्या इतर ग्रंथालयांत मिळून विभागली गेली असण्याची शक्यता आहे.

 जुन्या-नव्याचा दिमाखदार संगम झालेली युरोपातील ग्रंथालये !

अतिशय जुनी ग्रंथालये असल्याने तिथे सुरक्षेच्या कारणास्तव विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांविना किंवा त्या ग्रंथालयाच्या सभासदांशिवाय इतरांना मुक्त वावर नसतो. या ग्रंथालयांचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील स्वच्छता, हवेशीर परिसर, भरपूर प्रकाश असलेली व्यवस्था यांमुळे निर्माण होणारे प्रसन्न वातावरण ! या इमारती म्हणजे मध्य युरोपातील प्राचीन अभियांत्रिकी आणि वास्तूकला यांचा उत्तम नमुनाच आहेत. तिथे पाऊल टाकता क्षणीच त्यांच्या भव्यत्वाची प्रचीती येते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या पुरातन वास्तूंमधे संगणकांनीही स्थान पटकावले आहे आणि जुन्या नव्याचा दिमाखदार संगम इथे दिसून येतो.

अमेरिकेतील ग्रंथालये !

रोबार्ट्स लायब्ररी ही उत्तर अमेरिकेतील तिसर्‍या क्रमांकाची मोठी आणि उत्तम लायब्ररी आहे. तसा अमेरिका, कॅनडा हा भागच पुष्कळ अलीकडच्या काळात निर्माण झाला आहे. म्हणजे भारत, इंग्लंड, युरोप यांसारखी प्राचीन संस्कृती अमेरिका, कॅनडा या देशांना नाही. तिथले मूळ रहिवासी काही इतके प्रगत नव्हते की, त्यांच्याकडे प्राचीन ग्रंथालये वगैरे असतील. दक्षिण अमेरिकेतील काही भागांत असलेली प्राचीन संस्कृती युरोपीय आक्रमकांनी उद्ध्वस्त करून टाकली. म्हणूनच तिकडे प्राचीन ग्रंथालये नाहीत. त्यामुळे उत्तर अमेरिकेतील विद्यापिठांच्या इमारतींचा इतिहासही युरोपातील विद्यापिठांच्या तुलनेत पुष्कळच नवीन आहे.

अमेरिकेतील रोबार्ट्स लायब्ररी !

रोबार्ट्स लायब्ररी

रोबार्ट्स लायब्ररी ही १४ मजल्यांची उभीच्या उभी अत्याधुनिक भव्य इमारत आहे. रोबार्ट्सच्या इमारतीचे बांधकाम इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे की उपलब्ध जागेचा अधिकाधिक वापर केलेला आढळतो. तळ मजल्यालाच विद्यार्थ्यांसाठी, सभासदांसाठी, तसेच बाहेरून येणार्‍या पाहुण्यांसाठी ग्रंथालयाचा ‘ऑनलाईन कॅटलॉग’ (संगणकीय अनुक्रमणिका) शोधण्यासाठी संगणक उपलब्ध आहे. ऑक्स्ब्रीजमधील (ऑक्सफर्ड आणि केंब्रिज) ग्रंथालयांत सभासद नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला ग्रंथालयात प्रवेश नसतो. त्यामुळे रोबार्ट्सच्या पहिल्या २ मजल्यांवर वावरण्यासाठी सरकते जिने आहेत आणि इथेच विविध विषयांवरची पुस्तके, नियतकालिके मोठमोठ्या खणांमध्ये व्यवस्थित लावलेली आढळतात. कुठेही धुळीचे साम्राज्य नसून हे सभासद नसलेल्यांसाठी सुद्धा खुली असतात. तिथेच ४-५ संगणकांवर बाहेरून आलेले लोक विद्यापिठाच्या ऑनलाईन कॅटलॉगमधून संदर्भासाठी लागणारे पुस्तक किंवा लेख शोधू शकतात. (संदर्भ सापडणार ही १०० टक्के निश्चिती असल्याने) मिळालेला संदर्भ आपण तिथल्या ग्रंथपालांना सांगितला की, तो संदर्भ आपल्याला उपल्ब्ध करून दिला जातो. मला तर ही सगळ्यात मोठी गोष्ट वाटली.

ग्रंथालये एकमेकांशी जोडलेली असल्याने वाचकांना व्यापक सेवा उपलब्ध करून देऊ शकणे

केंब्रिज विद्यापीठ

केंब्रिजमध्ये ‘विद्यापिठाच्या ओळखपत्रा’वर आम्हाला ‘सिटी काऊन्सिल’च्या ग्रंथालयाचे सभासदत्व विनामूल्य मिळत असे. तेव्हा मी तेही घेतले होते. त्या ग्रंथालयाच्या कार्डवर ४ पुस्तके आणि २ सीडी मिळू शकत असत. सिडीमध्ये उत्तमोत्तम चित्रपट, लघुपट (डॉक्युमेंटरी) असे सगळे असते. प्रबंध सादर करून झाल्यावर मी या ग्रंथालयाचा पुरेपूर वापर करून घेतला. सिटी काऊन्सिल ग्रंथालयाच्या बर्‍याच ठिकाणी शाखा होत्या. त्या सर्व शाखा ‘इंटरनेट’ने जोडलेल्या होत्या. आर्बरी रोडच्या शाखेत मी एक पुस्तक पहात होते; पण ते त्या शाखेत नव्हते. तर त्या ग्रंथपालांनी ‘इतर कोणत्या शाखेत आहे का ?’ ते आपणहून पाहिले. २ पुस्तके दुसर्‍या शाखेत उपलब्ध होती. त्यांनी आपणहून त्यातील एक आरक्षित करून मला दुसर्‍या दिवशी येण्यास सांगितले.

हैफा विद्यापिठातील ग्रंथालयात भारतीय निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केलेला लेख आणि छायाचित्रे उपलब्ध !

हैफा विद्यापीठ

हैफा विद्यापिठाचे ग्रंथालयही अद्ययावत् आहे. विविध विषयांवरील पुस्तके आणि बसण्यास जागा हे तर आहेच. पण तिथे अजून एक विशेष गोष्ट दिसली ती म्हणजे एका प्राध्यापकाने जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या, म्हणजेच आपल्या भारतीय निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे. या अभ्यासाच्या काळात निवडणूक प्रक्रियेचे आणि अतिशय दुर्गम भागात निवडणूक अधिकारी कसे पोचतात ? आणि मतदानाची प्रक्रिया कशी पार पडते ? याचे छायाचित्रण केलेले आहे. त्यातील बरीच छायाचित्रे हैफा विद्यापिठाच्या ग्रंथालयाच्या बाहेरून दिसणार्‍या काचेच्या भिंतींवर लावलेली दिसली. त्या सगळ्या छायाचित्रांतून भारतातील निवडणूक प्रक्रिया आणि त्यातील गुंतागुंत, अडचणी सर्वकाही समजत होते. ते पहातांना मला आपल्या लोकशाहीचा पुष्कळ अभिमान वाटला.

स्पेनमध्ये छोट्या गावातही उत्तम ग्रंथालय !

उत्तर स्पेनमधील सिडेरा या छोट्या मत्स्योद्योगावर उपजिविका असणार्‍या, अटलांटीक समुद्राच्या काठी असलेल्या गावातही आम्हाला चांगले ग्रंथालय पहावयास मिळाले. ग्रंथालय छोटा तळ मजला + २ असे ३ मजली होते. तळ मजल्यावरच लहान मुलांचा आणि सीडी इ. चा विभाग होता. पहिल्या मजल्यावर पुस्तके तर होतीच; पण वाचकांना तिथेच बसून पुस्तके वाचण्याची सोय होती. संगणकांची रांगही होती. म्हणजे तिथे बसून ग्रंथालयाचे सभासद ‘नेट सर्फिंग’ (मायाजाळावर संदर्भ शोधणे) करू शकत होते. दुसर्‍या मजल्यावरही पुस्तके तर होतीच; पण कुणाला स्वत:चा भ्रमणसंगणक (लॅपटॉप) घेऊन अभ्यास/काम करत बसायचे असल्यास तसे बसण्याची जागा होती. त्यासाठी ‘वाय फाय इंटरनेट’ही उपलब्ध होते. आम्ही ते ग्रंथालय पहावयास रात्री ७.३० नंतर गेलो होतो. तिथे काही कुटुंबे त्यांच्या लहान मुलांसह तळ मजल्यावरील विभागात दिसली (पुस्तके घेण्यासाठी चक्क रांग लागलेली होती), तर पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावरही काही सभासद संगणकावर बसलेले, तर काही स्वत:चा भ्रमणसंगणक घेऊन बसलेले दिसले. म्हणजे इतक्या लहान गावातही (जिथे लोक फार शिकलेले नसावेत आणि फार मोठ्या शिक्षण संस्था नाहीत, त्यामुळे मोठी शैक्षणिक परंपराही नाही) ग्रंथालयाचा वापर व्यवस्थित होत होता, असे जाणवले.

हाँगकाँगमधील छोट्या बेटावरील अत्याधुनिक आणि उत्साहवर्धक ग्रंथालय !

हेच चित्र मला हाँगकाँगमधील लामा आयर्लंड या छोट्या मासेमारी करणार्‍या समाजाची सर्वाधिक असलेल्या बेटावरच्या ग्रंथालयातही दिसले. लामा आयर्लंडवर हाँगकाँगच्या मुख्य बेटावरून जी फेरी बोट येते त्याच्या ‘पोर्ट’वरच आपल्याला हे ग्रंथालय दिसते. तसे हे ग्रंथालय छोटेसेच दुमजली आहे; पण तळमजल्यावर ‘लामा आयर्लंड’ या बेटाचा इतिहास, छायाचित्रे, त्या छायाचित्रांची माहिती आणि १०-१५ मिनिटांची चिनी आणि इंग्रजी भाषांमधील ‘डिजिटल डॉक्युमेंटरी’ (संगणकीय लघुपट) आहे. ती पाहिल्यावर आपल्याला ‘लामा आयर्लंडवर आपण काय काय पाहू शकतो ?’ याची आणि त्याच्या इतिहासाची पुरेपूर माहिती मिळते. पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर प्रत्यक्ष ग्रंथालय आहे. ग्रंथालयाचे लँडस्केपिंग (रचना) अप्रतीम आहे. ज्या बाजूला समुद्र आहे, त्या बाजूला मोठमोठ्या खिडक्या आहेत अणि तिथे वाचत बसण्याची सोयही केलेली आहे. लहान मुलांसाठी वेगळे विभाग, संगणक वापरणार्‍यांसाठी ३-४ संगणकांची सोय, ज्यांना आपला भ्रमणसंगणक वापरायचा आहे, त्यांच्यासाठी ३-४ रिकाम्या जागा असलेली पटले आणि बाकी जागा पुस्तकांच्या विविध खणांनी भरलेली आहेत. तिथेच खाली बसून ज्यांना वाचायचे आहे, त्यांना बसण्यासाठी जागा आहे. ग्रंथपाल आणि त्याचे साहाय्यक पुस्तकांची देवाणघेवाण करण्यात, तसेच नियम पाळण्यात अतिशय तत्पर ! पुष्कळच उत्साहवर्धक असे दृश्य होते ते.

विदेशांतील सर्व ग्रंथालयांत वाचकांचे सुहास्य वदनाने स्वागत होते !

या सगळ्या विद्यापिठांच्या ग्रंथालयांत आपल्याकडील ग्रंथालयांच्यापेक्षा एक अतिशय वेगळा अनुभव येतो तो म्हणजे आपले एकदम हसून स्वागत होते आणि ‘मी आपली काही मदत करू शकते/तो का ?’ हा प्रश्न सुहास्यवदनाने विचारला जातो.

भारतातील ग्रंथालयाची स्थिती सुधारण्याची आवश्यकता !

हे सगळे इतके तपशिलात मांडण्याचे कारण म्हणजे अजूनही आपल्याकडे ‘डॉक्युमेंटेशन’ची आणि उत्तम ग्रंथालयांची वानवा आहे. जी उत्तम ग्रंथालये आपल्याकडे होती (आता होती असेच म्हणावे लागेल; कारण आपल्याकडे असलेला ठेवा कसा जपायचा ? याची जाण नाही.) त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन आता ती शेवटचे श्वास घेण्याच्या मार्गावर आहेत. अंधारी जागा, कुबट वास आणि पुस्तकांवर चढलेली धुळीची पुटं ही आपल्याकडील ग्रंथालयांची वैशिष्ट्ये आहेत. अद्ययावत् पुस्तके या ग्रंथालयांत उपलब्ध नसतात, तसेच आपण ग्रंथालयांत प्रवेश केल्यावर ग्रंथपालाच्या चेहर्‍यावर ‘कुठून आले हे इथे ?, कशाला आले आता त्रास द्यायला ?’ असेच भाव असतात. ‘दुष्काळात तेरावा महिना’ याप्रमाणे आता दूरचित्रवाणी, भ्रमणभाष आणि इंटरनेट यांची भर पडल्याने ‘ग्रंथालयातून आणून पुस्तक वाचणे’ हा भाग अल्प झालेला आहे. काही जण ‘डिजिटल पुस्तके’ वाचतात; पण त्यात प्रत्यक्ष पुस्तक हाताळण्याची….पुस्तके वाचतांना त्यांच्या येणार्‍या वासाची मजा नाही.

पुण्यातील विद्यापिठातील ग्रंथालयांची दुरवस्था आणि असुविधा अन् काही चांगली ग्रंथालये !

२५-३० वर्षांपूर्वी पुणे विद्यापिठातील जयकर ग्रंथालयात आणि स.प. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात धूळ, अंधार आणि कुबट वास याचंच साम्राज्य मी पाहिलेले आणि अनुभवलेले होते. त्यामुळे पुन्हा तिथे जावेसे वाटत नसे. या ठिकाणी संगणकांची उपस्थिती दिसली, तरी जोडणीची अडचण असते. ‘डिजिटल लायब्ररी’च्या माध्यमातून अत्यावश्यक नियतकालिके उपलब्ध नसतात किंवा बाहेरच्या ‘डिजिटल लायब्रर्‍यां’शी संपर्क नसतो. यामुळे ‘हे सगळेच देखाव्यासाठी आहे कि काय ?’ असे वाटते. स्वच्छता आणि हवेशीर प्रसन्न वातावरण याविषयी काही नवीन ग्रंथालये अपवाद आहेत; जसे पुण्यातील ब्रिटीश कौन्सिलचे ग्रंथालय. पुण्यातील बालभारती संस्थेचे (सरकारी असली तरी) ग्रंथालय, हे असेच एक नमूद करण्यासारखे छान ग्रंथालय आहे.

‘ग्रंथालयांचा वापर कशा प्रकारे केला जातो ?’  यावरच ग्रंथालयाची खरी शोभा अवलंबून !

ग्रंथालयाची खरी शोभा ही ‘त्याचा वापर करणारे’ असतात. त्यामुळे त्यांचीच वानवा असेल, तर हीच ग्रंथालये भकास वाटतात. ५ जानेवारी २००४ या दिवशी काही समाजकंटकांनी एका नेत्याने सोडलेल्या चुकीच्या माहितीच्या अफवेच्या आहारी जाऊन भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या ग्रंथालयात धुडगुस घालून तोडफोड करून अत्यंत दुर्मिळ हस्तलिखिते आणि ग्रंथ यांची हानी केलेली होती. देहलीतील जे.एन्.यू, देहली विद्यापीठ, जामिया मिलिया विद्यापीठ या केंद्रीय विद्यापिठांची ग्रंथालये बाहेरून छान दिसत असली, तरी ‘त्यातील विद्यार्थी त्यांचा कसा वापर करतात ?’ यावरच सगळे अवलंबून आहे. मध्ये वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांत या तीनही ठिकाणी विद्यार्थ्यांनी घुसखोरी करून पोलिसांपासून लपण्यासाठी केलेला वापर, तसेच त्यांची तोडफोडही केलेली आपण पाहिलेले होते. ‘मी हे भलतेच आणि अत्यंत नकारात्मक बोलत आहे’, असे अनेकांना वाटत असेल; पण ज्यांनी भारतीय विद्यापिठांतील ग्रंथालये, त्यात उपलब्ध पुस्तके यांचा अनुभव घेऊन जर इंग्लंड-युरोप, उत्तर अमेरिका येथील नामांकित विद्यापिठांची ग्रंथालये अनुभवली असतील पाहिली असतील, त्यांना माझे सूत्र पटेल.

देशात उत्तमोत्तम ग्रंथालयांचे संवर्धन झाले पाहिजे !

पूर्वी पुण्याच्या भागाभागांत छोटी छोटी ग्रंथालये दिसत असत. अर्थात् त्यात केवळ कादंबर्‍या वाचणार्‍यांचाच भरणा जास्त असे. लहानपणी सोलापुरात हिराचंद नेमचंद वाचनालय पाहिलेले आहे. ते सोलापुरातील एक मोठे ग्रंथालय होते. तसेच पूर्वी ‘पुणे नगर वाचन मंदिर’ होते. आता पुण्यात सगळीकडे एम्.पी.एस्.सी., यु.पी.एस्.सी.च्या नावाखाली अभ्यासिकांचा सुळसुळाट झाला आहे. ‘पुणे हे विद्येचे माहेर आहे’, असे म्हणतात. तसेच ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ (पूर्वेचे ऑक्सफर्ड)ही म्हणतात; पण मग पुण्यात ग्रंथालयांची फारशी चांगली स्थिती का नसावी ? यावर आपण कृपया अंतर्मुख व्हावयास हवे. आपल्याला देशाची भरभराट करायची असेल, तर देशात उत्तमोत्तम ग्रंथालयांचे संवर्धन केले पाहिजे. विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच ग्रंथालयांचा वापर कसा करायचा ? हे शिकवले पाहिजे. घरातही पुस्तक वाचनाची परंपरा असेल, म्हणजेच ज्या घरात आई-वडील स्वत: दूरचित्रवाणी न पहाता, स्मार्टफोन मध्ये डोके न खुपसता पुस्तकं वाचत असतील, तर त्या घरातील मुले नक्कीच वाचन परंपरा पुढे नेतील. चला तर मग आपण या सगळ्याचा गांभिर्याने विचार करून कामास लागूया !

– डॉ. अपर्णा लळिंगकर, पी.एच्.डी. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य (२३ एप्रिल २०२४)

(फेसबूकवरून)